एकलहरे : येथील रेल्वे ट्रॅक्शनजवळील भोर मळ्यात गेल्या चार दिवसांपूर्वी गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यात संपूर्ण कुटुंबच जबरदस्त भाजले गेले. उपचार सुरू असताना त्यातील मुलाचे निधन झाले. त्यापाठोपाठ आई-वडिलांचेही निधन झाले. दोन लहान भावा-बहिणींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अनेक प्रश्न समोर आले. त्यांची यथायोग्य सांगड घालून ते सोडवण्याचा प्रयत्न होईल का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.कंपनीत सिलिंडरची रिफिलिंग होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जी साखळी आहे त्यात कंपनीतून गाडी भरून वितरकापर्यंत पोहोचविणारी वाहतूक व्यवस्था, वितरकांकडून ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचवणारी वाहतूक व्यवस्था सदोष दिसते. मुळात कंपनीत गॅस सिलिंडर रिफिलिंग करताना पुरेसे डिलिव्हरी बॉइज म्हणजे कर्मचारी नसतात. सिलिंडर रिफिलिंग करताना व्हॉल तपासून रेग्युलेटर बसते की नाही याची शहानिशा करूनच प्रत्येक सिलिंडर कंपनीच्या बाहेर आले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गॅस सिलिंडर पोहोचविण्याच्या प्रयत्नात हे सगळे पाहण्यासाठी कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. कंपनीतून सिलिंडर भरून गाडी बाहेर आल्यावर वाहतूक व्यवस्थेत काही गैरप्रकार होत नाही ना याची शहानिशा वितरकाने करून घेतली पाहिजे. कारण कंपनीतून गाडी बाहेर गेल्यावर ती ज्या वितरकाकडे जाणार आहे त्यांची जबाबदारी सुरू होते. काही वेळा वितरकाकडेही सिलिंडरमधील गॅसचोरीच्या घटना घडल्याच्या घटना घडल्या आहेत. वितरकाकडून ग्राहकापर्यंत सिलिंडर पोहोचविण्याची जबाबदारी डिलिव्हरी बॉइजकडे असते. काहीवेळा या साखळीतही सिलिंडरमधील गॅसचोरीचे प्रकार समोर आले आहेत. वितरकाकडून आलेले सिलिंडर ग्राहकाला देताना तपासणी करून व वजन करूनच दिले पाहिजे. मात्र अनेकदा असे होत नाही. लिकेजची तक्र ार आल्यावर लगेचच मेकॅनिक पाठवून त्वरित कार्यवाही केली पाहिजे. या सर्व बाबी धावपळीच्या कचाट्यात तंतोतंत पाळल्या जात नाहीत, अशा अनेकदा तक्रारी असतात. असे का होते, याबाबत माहिती घेतली असता असे आढळून आले की, वितरकाकडून डिलिव्हरी करण्यासाठी नाममात्र पगारावर कामगार नेमले जातात. ते ग्राहकांना समाधानकारक सेवा देतातच असे नाही. कित्येकदा सिलिंडरच्या किमतीपेक्षा वीस ते तीस रु पये डिलिव्हरी शुल्क आकारले जाते. प्रत्येक सिलिंडर वजन करून देण्यास त्यांच्याकडे वेळ नसतो. सिलिंडरची वितरणप्रणाली ही पूर्णपणे खासगी असते. त्यात कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे बोलले जाते.महिलांनी काळजी घेण्याची गरजग्राहकापर्यंत सिलिंडर पोहोचल्यावर ग्राहकाची जबाबदारी सुरू होते. कारण सिलिंडर लावताना महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. सिलिंडरच्या जागेपेक्षा शेगडी उंच जागेवर म्हणजेच किचन ओट्यावर ठेवली पाहिजे. किचनमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. एवढेच नाही तर देव्हारासुद्धा ठेवू नये. रबरट्यूब व शेगडी आय.एस.आय. मानांकित असावी. स्वयंपाक झाल्यावर रेग्युलेटरचे बटन बंद करून ठेवावे. रबर ट्यूबला टी कनेक्शन जोडू नये. त्यामुळे गॅस लिकेजची शक्यता वाढते. गॅसचा वास येत असल्यास दारे खिडक्या उघड्या करून ठेवाव्यात व मेकॅनिकला फोन करून बोलावून घ्यावे.
सिलिंडर वितरणप्रणाली सदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:37 AM