मालेगाव:- येथील अंजुमन चौकातील एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या आगीत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. येथील अंजुमन चौकात राहणारे खुर्शीद अहमद अब्दूल गफ्फार यांच्या मालकीच्या घर क्रमांक ४०३ /ब मधील तिसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने खुर्शिद अहमद यांचे कुटुंबीय लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. या आगीमुळे घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाचे जवान रफिक खान, जीवन महिरे, अमोल जाधव, अमोल शिरसाट, फिरोज खान, नवनाथ शेवाळे ,जमील शेख आदींसह घटनास्थळी धाव घेतली. घरात एकूण तीन सिलिंडर भरलेले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे अधीक्षक पवार यांनी तीनही सिलिंडर तातडीने घराबाहेर काढले. या भागात मोठी नागरी वस्ती आहे, यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे विझवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.
----------------------------
शेरुळला सहा ट्रॅक्टर चाऱ्यासह तीन जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी
मालेगाव:- तालुक्यातील शेरुळ येथील नीलेश महाले यांच्या शेतातील दहा ट्रॅक्टर चाऱ्याला अचानक आग लागली. या आगीत सहा ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे तर गोठ्यातील १९ जनावरांपैकी तीन जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. पाच जनावरे जखमी झाले आहेत. इतर जनावरे वाचवण्यात शेतकऱ्यांना व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. शेरुळ गावालगतच्या शेतातील चाऱ्याला व गोठ्याला अचानक आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. परिसरातील शेतकऱ्यांनी ही आग विझविण्यात मदत केली. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात उसळले होते. याप्रकरणी अकस्मात जळीताची नोंद घेण्यात आली आहे.