लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या घरगुती गॅसचोरीचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर जिल्हा शासकीय यंत्रणेने संबंधितांवर कारवाई करण्यास योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील जवळपास सर्वच एजन्सीधारकांना लेखी सूचना देत, प्रत्येक ग्राहकाला घरगुती गॅस सिलिंडरचे वजन करून द्यावेच लागेल; अन्यथा कारवाई केली जाईल अशी एकप्रकारची ताकीदच देण्यात आली आहे. ‘शहरात गॅसचोरीचे रॅकेट’ अशा मथळ्याखाली लोकमतने स्टिंग आॅपरेशन करून गॅसचोरी करणाऱ्या एजन्सी कर्मचाऱ्यांचा भांडाफोड केला होता. सातपूरमधील सोमेश्वर कॉलनी परिसरात स्वामी समर्थ गॅस एजन्सीचे कथित कर्मचारी दिवसाढवळ्या घरगुती गॅसची चोरी करीत असल्याचे ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. वास्तविक इतर राज्यातील अशाप्रकारचे व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असल्याने, शहरातही असेच काहीसे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे प्राप्त झाल्या होत्या. तेव्हापासूनच याविषयीचा पाठपुरावा केला जात होता. अखेर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात ‘लोकमत’ला यश आले. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत तातडीने बैठक बोलावून शहरातील सर्वच एजन्सीधारकांना लेखी सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार ग्राहकाला घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण करताना त्याचे वजन करून देणे सक्तीचे असेल. त्याचबरोबर डिलिव्हरी बॉयकडून गॅस चोरी करण्यासाठी सिलिंडरचे सील काढण्याचे प्रयत्न केले जात असल्याने सिलिंडरचा वॉल्व्ह लिक होण्याची शक्यता असते. अशात सिलिंडरमधील बराचसा गॅस वाया जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे सिलिंडरचे वितरण करताना संबंधित डिलिव्हरी बंॉयला लिक डिटेक्टर मशीनने सिलिंडरची तपासणी करूनच ते ग्राहकांना द्यावे लागणार आहे. जर असे करण्यास संबंधित कर्मचाऱ्याने नकार दिल्यास, त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचेही जिल्हा पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गॅस वितरक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांची भेट घेऊन त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांविषयीचे निवेदन दिले. या निवेदनात सिलिंडर वितरणासाठी कर्मचारी नियुक्त करताना येत असलेल्या अडचणी, तसेच या क्षेत्रात फोफावत असलेली गुंडगिरी याचा उल्लेख या निवेदनात केला आहे.
सिलिंडरचे वजन करून द्यावेच लागणार!
By admin | Published: July 08, 2017 12:46 AM