दाभाडी : जिल्ह्यातील मालेगाव येथे कोरोनाची परिस्थिती गंभीर दिसून येत आहे. रुग्णवाढ थांबावी यासाठी मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
दाभाडी येथे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर प्रतिबंध आणावा, यासाठी शासन, प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत. परंतु, परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. रोजचा वाढणारा कोरोनाबधितांचा आकडा तसेच मृतांचा आकडा चिंतेचा विषय बनत आहे. त्यामुळे आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने गावात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून बेशिस्त लोकांवर कारवाई केली. या कारवाईने नियम मोडणाऱ्या नागरिकांना चांगलीच चपराक बसली.
मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी आपल्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी शैलेश निकम, ग्रामसेवक भास्कर पाटील, माजी सरपंच सुभाष नहिरे, ग्रामपंचायत सदस्य शरद देवरे, दादाजी सुपारे, डॉ. देवेंद्र निकम, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद निकम, नीलकंठ निकम, मराठा महासंघाचे अमोल निकम, हरिदादा निकम, ग्रामपंचायत कर्मचारी यशवंत निकम, बलदेव सुपारे यांना घेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली.
चौकट
चकवा देणाऱ्यांना पकडले
विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या या कारवाई पथकाला चकवा देत एक रिक्षा फरार झाली. यावेळी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ आपल्या शासकीय वाहनाने शासन आदेश मोडणाऱ्या त्या रिक्षाचा पाठलाग करून पकडले व संबंधितांवर कारवाई केली.
कोट....
विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मास्कसह इतर नियम पाळल्यास कोरोनाला आळा नक्कीच बसेल. यामुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहोत, जेणेकरून योग्य ती शिस्त लागेल.
- जितेंद्र देवरे, गटविकास अधिकारी, मालेगाव.
फोटो - ०८ दाभाडी ॲक्शन
रस्त्यावरील नागरिकांना मास्क वापरण्याबद्दल सूचना देऊन कारवाई करताना मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, माजी सरपंच सुभाष नहिरे, ग्रामसेवक भास्कर पाटील आदी.
===Photopath===
080521\08nsk_25_08052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०८ दाभाडी ॲक्शन रस्त्यावरील नागरिकांना मास्क वापरण्याबद्दल सूचना देऊन कारवाई करतांना मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे समवेत माजी सरपंच सुभाष नहिरे, ग्रामसेवक भास्कर पाटील आदी