नाशिक : राज्यातील नव्या सत्ता समिकरणात राष्ट्रवादीचा सहभाग झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदी छगन भुजबळ यांची नियुक्ती करण्यात येणार अशी चर्चा असतानाच सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक बोलावली आहे. मात्र, ही बैठक होत असताना नाशिकमध्ये येऊनही छगन भुजबळ हे सायंकाळी येवला दौऱ्यावर जाणार असल्याचे पालकमंत्रीपदावरून सुप्त संघर्ष सुरू झाल्याची चर्चा आहे.
राज्यात मंत्री मंडळात राष्ट्रवादी सहभागी झाल्यानंतर नाशिकचे माजी पालकमंत्री आणि येवला मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच मंत्री मंडळाचे वाटप होणार असले तरी भुजबळ यांचा आक्रमक स्वभाव आणि ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर त्यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात येईल अशी देखील चर्चा असल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे.
त्यामुळेच पालकमंत्री दादा भुसे यांनी खाते वाटप आणि पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीचे फेरवाटप होण्याच्या आतच शुक्रवारी घाई घाईने नियोजन मंडळाची बैठक बोलवली. गुरूवारी (दि.१३) छगन भुजबळ हे नाशिकमध्ये दाखल मात्र, शुक्रवारी ४ वाजता डीपीडीसीची बैठक असताना नेमके यावेळीच भुजबळ यांनी येवला मतदार संघात कार्यक्रम घेऊन दौरा केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.