आडगाव : शहरासह जिल्ह्यात बिबट्यांचे वाढते प्रजनन आणि अन्नपाण्याच्या शोधात वाढती भटकंती बिबट्यासाठी धोकादायक ठरू लागली आहे. मुंबई-आग्रा महामार्गापासून जवळच आडगाव शिवारात मंगळवारी (दि.२२) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारात मृतावस्थेत प्रौढ नर बिबट्या आढळून आला. बिबट्याच्या पाठीवरील केस निघालेले असल्यामुळे प्रथमदर्शनी अपघात नसून घातपाताचा संशय व्यक्त होत होता.आडगावकडे जाताना वेशीवर स्मशानभूमीलगत असलेल्या नैसर्गिक नाल्याच्या कडेला बिबट्या मृतावस्थेत पडलेला असल्याचे रस्त्याने ये-जा करणाऱ्या गावकºयांच्या लक्षात आले. गावकºयांनी तत्काळ त्याची माहिती आडगाव पोलीस ठाणे व वनविभागाला कळविली. काही वेळातच घटनास्थळी आडगाव पोलीस दाखल झाले. तोपर्यंत शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह गावकºयांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. बघ्यांच्या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविले. अंधश्रद्धेपोटी बिबट्याचा बळी दिला गेला असल्याची चर्चा सुरू झाली होती. वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, रोहिणी पाटील, वन्यजीवप्रेमी अभिजित महाले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ बिबट्याचा मृतदेह वनविभागाच्या वाहनातून अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्यात आला. दवाखान्यात तत्काळ पशुधन विकास अधिकारी डॉ. संदीप पवार यांनी मृतदेहाची तपासणी केली. यावेळी वनअधिकारी, कर्मचाºयांनी संपूर्र्ण पंचनामा केला. बिबट्याच्या कमरेला वाहनाची जोरदार धडक बसल्याने तो तीन दिवसांपूर्वी जखमी झाला असल्याचा अंदाज यावेळी पशुवैद्यकीय व वनविभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. पाठीवर कोरडी जखम आढळून आली. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी शवविच्छेदन केले असता अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. यामुळे घातपाताच्या संशयाची चर्चा निरर्थक व निराधार ठरली.तीन दिवसांपूर्वी अपघातसुमारे तीन दिवसांपूर्वी रस्ता ओलांडताना रात्रीच्या सुमारास वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला असावा, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला मुका मार व पाठीला जखम झाली असावी, तसेच पोटाला मार लागल्यामुळे मूत्रपिंड व यकृत निकामी होऊन बिबट्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याचा निष्कर्षही डॉक्टरांनी काढला आहे.गंगापूर रोपवाटिकेत अंत्यसंस्कारबिबट्याच्या मृतदेहावर गंगापूर येथील शासकीय रोपवाटिकेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी वनविभागाच्या अधिकाºयांनी पुन्हा बिबट्याच्या मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण करून खात्रीशिर बाबी नोंदवून घेतल्या. यावेळी सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक अमित खरे, वन्यजीवप्रेमी अभिजित महाले आदी उपस्थित वन्यजीवप्रेमींना गहिवरून आले व त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्याचे दिसले.बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याने त्याच्या कमरेचा भाग रस्त्याला घासला गेला आणि त्यामुळे के स निघाले. त्वचेलादेखील जखम झाली; मात्र अपघाताला तीन ते चार दिवस झाल्यामुळे जखम कोरडी झाल्याचे दिसते. बिबट्याच्या मिशीच्या केसांपासून नखांपर्यंत सगळे अवयव शाबूत आहेत. त्यामुळे घातपाताची संशयाला जागा नाही. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध वनविभागाने गुन्हा नोंदविला आहे. - राजेंद्र मगदुम, सहायक वनसंरक्षक, नाशिक पश्चिम
आडगावला वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:43 AM