देवळा : भावडघाटात आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार झाला. विंचूर प्रकाशा ( राष्ट्रीय महामार्ग क्र . १७ ) मार्गावर देवळा शहरापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या भावडघाटात शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान वनकक्ष क्र . ३२४ मध्ये ही घटना घडली. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने पूर्ण वाढ झालेला नर जातीचा बिबट्या ठार झाला. देवळा पोलिसांच्या गस्ती पथकाला सदर बिबट्या रस्त्यावर मृतावस्थेत पडलेला दिसला. पोलिसांनी देवळा वन विभागाला घटनेची माहिती दिली. वन परीक्षेत्र अधिकारी ए.एन. शेख, वनपरिमंडल अधिकारी ए.ई. सोनवणे, वनपाल डि.पी. गवळी, वनरक्षक आर.एस. पठाण, व वनकर्मचारी त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी बिबट्याचा मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालय देवळा येथे आणण्यात आले.पशुधन विकास अधिकारी डॉ.पी. डी. साळवे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर देवळा वन विभाग कार्यालयाच्या आवारात बिबटयावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. शिवबाला, सहायक वन संरक्षक राजेंद्र कापसे वन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 12:59 PM