नाशिक : बहीण भावाच्या नात्याला रेशीम बंधांनी बांधणाºया हजारो सुबक राख्या शहरातील दिव्यांग मुलांकडून तयार करण्यात आल्या आहेत. जुन्या पंडित कॉलनीतील प्रबोधिनी संस्था आणि नॅब (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड)यांच्या वतीने दिव्यांग मुलांकडून हजारो राख्या तयार झाल्या असून, राख्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.प्रबोधिनी शाळेत मुलांमधील कल्पकतेचा विकास व्हावा, नवनिर्मितीचा आनंद मिळावा,आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने गेल्या २५ वर्षांपासून मुलांकडून राख्या बनवून घेण्याचा उपक्रम राबविला जात आहे. अकरा हजार राख्या बनविण्याचे उद्दिष्ट असून, पैकी साडेनऊ हजारच्या आसपास राख्या तयार झाल्या आहेत. शाळेतील विविध वयोगटांतील ७० मुले राख्या बनवित असून, त्यांना दीपाली पाटील, मनीषा देवरे, मनीषा नलगे, संजीवनी शिवांगे, पुष्पा वेलकर, कांचन इप्पर आदी शिक्षक राख्या बनविण्याचे प्रात्यक्षिक देत आहेत. रेशीम दोºयात मणी ओवणे, फूल, चमकी ओवणे आदी कामे मुले हिरिरीने करत आहेत. या राख्या शहरातील शाळांमध्ये दिल्या जात असून, मुलांनी, स्टाफने त्या विकत घेत दिव्यांग मुलांविषयी, त्यांच्या कलेविषयी जाणून घ्यावे यासाठी त्यांचे प्रबोधनही केले जात आहे.सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र देऊन राख्यांविषयी, संस्थेविषयी व उपक्रमाविषयी माहिती दिली जात आहे. एका पॅटर्नच्या सुबक राख्या ५ रुपये या नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जात आहे. प्रबोधिनीबरोबरच नॅब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड या संस्थेतील तिसरी ते दहावीच्या ५० मुली राख्या तयार करण्याचे काम करत असून, आजपर्यंत २५० राख्या तयार झाल्या आहेत. या मुलींना राख्या तयार करायला शिकविण्याचे काम कलाशिक्षक छाया तांबट या करीत आहेत. नॅबमध्ये तयार होणाºया राख्या विकल्या जात नाहीत. नॅबमध्ये असणाºया मुलींना दर राखी पौर्णिमेला त्यांचे बाहेरगावी राहणारे भाऊ भेटायला येतात. त्या भावांना या बहिणींनी स्वत:च्या हाताने या मुली मोती, कुंदन, रेशीम, चमकी आदी साहित्य वापरून तयार केलेल्या कलात्मक राख्या बांधल्या जातात. नॅबमध्ये २० वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. दिव्यांग मुली व त्यांच्या भावंडांना रक्षाबंधनाच्या दिवशी एक वेगळाच आनंद याद्वारे घेता येत आहे.
दिव्यांगांकडून तयार होताय सुबक राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:33 AM