याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मधुमैत्री बंगल्यात राहणारे डॉ. नरेंद्र पाटील व त्यांची पत्नी कामानिमित्त बुधवारी दुपारच्या सुमारास बंगल्याचा दरवाजा बंद करून घराबाहेर पडले. बंगल्याच्या मुख्य दरवाजाला आतील बाजूने लॉक करण्यात आले असतानाही चोरट्यांनी हे लॉक तोडून मुख्य दरवाजातून घरामध्ये प्रवेश केला. घरातील लोखंडी गोदरेजची तिजोरीच चोरट्यांनी पळविली. या तिजोरीत सुमारे ११ लाख रुपयांची रोकड व तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असल्याचे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दवाखान्याची बाह्यरुग्ण तपासणी आटोपून पाटील जेव्हा संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी तत्काळ बेडरूममध्ये धाव घेतली असता तेथे रोकड, दागिने असलेली तिजोरीच गायब असल्याचे दिसले. पाटील यांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती तत्काल बिनतारी संदेश यंत्रणेवरून देत परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. सातपूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
--इन्फो--
शहरात गुन्हेगारीने काढले डोके वर
नाशिक शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीने नववर्षात डोके वर काढले आहे. शहर पोलिसांपुढे वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान उभे राहिले आहे. शहरात खून, घरफोड्या, जबरी लूट, हाणामाऱ्या, वाहनचोरीसारख्या घटना सातत्याने घडू लागल्याने नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त केवळ नावापुरतीच घातली जात आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. नाकाबंदीतही चोरटे हाती लागत नाही आणि गस्त सुरू असतानाही गुन्हे थांबत नाही, भरदिवसा बंद घरे फोडली जातात तर घरांच्या आवारातून वाहने लंपास होतात. त्यामुळे जणू गुन्हेगारांवरील खाकीचा वचक संपुष्टात आला की काय? अशी शंका घेतली जात आहे.