लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने धुवाधार बॅटिंग केली असून, पावसाची टक्केवारी व धरणाच्या पाण्याची क्षमता झपाट्याने वाढत आहे, तर इगतपुरीचा पश्चिम परिसर जलमय झाला आहे. तालुक्यात ४८ तासात ३०० मिमी इतका दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात तालुुक्यातील एकूण पाऊस ६३ टक्के झाला आहे, तर दारणा, कडवा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. वैतरणा व मुकणे धरणात मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे.तालुक्यात भावली धरण गेल्या दोन दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाले असून, दारणा व कडवा ही धरणे अनुक्रमे ८० व ८५ टक्के भरून स्थिरावली आहे. दारणा धरणातून १३ हजार क्यूसेक्स तर कडवा धरणातून ७ हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग होत आहे. भावली धरणातून १६०० क्यूसेक्स पाणी विसर्ग होत आहे. वैतरणा धरण ७२ टक्के, तर मुकणे धरण ३६ टक्के, तर वाकी धरण ३५ टक्के साठा झाला आहे. इगतपुरी तालुक्यात चोवीस तासात १५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत २१८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर गेल्या पाच दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भात शेती पूर्ण पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकरीदेखील चिंतित झाला आहे.नांदूरमधमेश्वरमधून पाणी सोडलेनिफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून शनिवारी ३३ हजार ७६४ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी तालुक्यात दिवसभर संततधार असल्याने शेतकरीवर्गात समाधान होते. शनिवारी जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, भावली, कडवा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी आणि दारणा या नद्यातून नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात पाणी आल्याने विसर्ग सुरू आहे. उजवा व एक्स्प्रेस कालव्यानाही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग झाल्याने गोदाकाठावरील सायखेडा आणी चांदोरी या गावांना संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेता तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चांदोरी येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदिराचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग पाण्याखाली आला आहे. सायखेडा येथील गोदावरी नदीवरील धोकादायक पुलाच्या खाली पाणी आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून होणारा विसर्ग असाच सुरू ठेवावा लागणार आहे किंवा त्यात वाढ करावी लागेल अन्यथा सायखेडा व चांदोरी या गावांना पुराचा वेढा बसू शकतो.
जिल्ह्यातील धरणातून विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 1:02 AM