पेठ : गत आठवडयापासून तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने जवळपास सर्वच लहान मोठया धरणांच्या पाणीसाठयात झपाटयाने वाढ होत बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने धरणालगत व नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पेठ तालुक्यात पाहुचीबारी, हरणगाव, गावंधपाडा (श्रीमंत), इनामबारी, शिंदे, पाटे, लिंगपणे, शिराळकुंड आदी धरणे असून सर्वच धरणाच्या उगम क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने व धरणाची क्षमता कमी असल्याने धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सांडव्यातून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदी काठच्या नागरिकांनी धरणाजवळ जाणे टाळावे तसेच नदीपात्रातून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचे धाडस करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकरी वर्गाने आपले पाळीव प्राणी सुरक्षित जागेवर हलवावेत, असेही कळवण्यात आले आहे. जुलै अखेर पेठ तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली असून अजूनही पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत नाही.
पेठ तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 3:43 PM
संततधार : नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ठळक मुद्देपावसाचा जोर कायम असल्याने सांडव्यातून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू