सिन्नर: मजिप्राच्या पाणीपुरवठ्याची पाइपलाइन गाडतांना पांगरी-सुरेगाव रस्त्याची जेसीबीने साईडपट्टी व डांबरीकरण फोडून वाट लावण्यात आल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे. सदर ठेकेदाराकडून रस्ता व साईडपट्टी दुरुस्त करुन देईपर्यंत त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये अशा मागणीचे निवेदन पगार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत वाड्यावस्त्यांवर पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. तथापि, सदर काम करतांना पांगरी येथील जलकुंभापासून ते सुरेगाव रस्त्याने सुमारे दोन किलोमीटर वस्तीवर पाइपलाइन नेण्यासाठी सुरेगाव रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले. हे खोदकाम या डांबरीकरण असलेल्या रस्त्यापासून एक ते दीड मीटर दूर अंतरावर करणे गरजेचे होते. मात्र ठेकेदाराच्या जेसीबीने रस्त्यालगतच साईडपट्ट्यांवर खोदकाम करुन पाइप गाडण्यात आले. त्यामुळे साईडपट्टीसह कडेचा डांबरी रस्ता उखडला असल्याची तक्रार पगार यांनी केली आहे. साईडपट्ट्या खोदण्यात आल्याने माती डांबरी रस्त्यावर आली असून पावसाळ्यात दुचाकी घसरुन अपघात होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. पंचायत समिती सदस्य पगार यांच्यासह उपसरपंच बाबासाहेब पगार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आत्माराम पगार, सदस्य नूतन निरगुडे, मनीषा पगार, विद्या पगार, रईस कादरी, शिवाजी पवार, सुभद्रा पगार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.