पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरात झालेल्या जोरदार पावसाने परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेतातून अजूनही शिवारातील शेतीतील पावसाचे पाणी पिकांमधून वाहत असल्याने पाणी वाहत असलेल्या शेतातील पिके पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर असून, या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची मोठी हानी झाली आहे.येथील शेतकरी दिलीप सूर्यवंशी व नानाजी जाधव या शेतकर्यांच्या शेड मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या शेतकरी बांधवाचा कांदा भिजला गेला आहे. तसेच मागील पावसातही अविनाश वाघ यांच्या कांदा चाळीत शिवारातील पाणी शिरल्याने चाळीतील शेडमध्ये कुड करून साठवलेला बारा ट्रॅक्टर कांदा खराब झाला. मार्केट बंद असल्याकारणाने कांदा विकता आला नसल्यामुळे, भिजलेला कांदा वाळवूनही पूर्णता खराब होऊन टाकून द्यावा लागला. आजही मार्केट बंद असल्यामुळे पावसाने भिजलेला कांदा खराब होत आहे. परिसरात पावसाळा लागल्यापासून पाऊस हा चांगला झाला असल्याने शेतकरी समाधानी झाला असला तरी , जोरदार झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहे. परिसरात एक महिन्यापासून दोनदा मुसळधार पाऊस झाल्याने, परिसरात गारवा वाढल्यामुळे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागला असून, पिकांनाही या पावसाचा फटका बसला असल्यामुळे पिकांची उत्तम वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.(वार्ताहर)
पिळकोस शिवारातील शेतीतील पिकांचे नुकसान
By admin | Published: August 06, 2016 12:08 AM