मालेगाव : तालुक्यात दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे १३१.१० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा तालुक्यातील १९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत शहर व तालुक्याचा काही भाग पावसाने चांगलाच झोडपून काढला आहे. कुकाणे येथील धनराज चिंधा दासनूर यांच्या मालकीची गाय वीज पडून ठार झाली. पावसासह वादळी वारा असल्याने ८३ घरांची पडझड झाली आहे. वादळाच्या तडाख्याने १३१.१० हेक्टरवरील डाळिंब, आंबा, कांदा, पपई, शेवगा व इतर तृणधान्यांचे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल तयार केला आहे. नुकसानग्रस्त आघार बुद्रुक, बेळगाव, तळवाडे, रावळगाव, जळगाव गा. व पिंपळगाव या भागांची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याचे राजपूत यांनी सांगितले. यास चक्रीवादळामुळे पुढील काही दिवस वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकरी, पशुपालक व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राजपूत यांनी केले आहे.
मालेगाव तालुक्यात १३१.१० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 3:31 PM