उमराणे : उमराणेसह परिसरात गेल्या पंधरवाड्यापासुन सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीवर आलेल्या डाळींब बागांत पाणी साचल्याने तेल्या रोगाने थैमान घातले असुन डाळींब उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे.तसेच मका पिकही कापणीला आले असतानाच शेतात पाणी साचल्याने मका पिक काढणीसाठी शेतकरी विवंचनेत सापडला आहे. मागील वर्षी लष्करी अळींने थैमान घातल्यानंतर मागील वर्षीची तुट भरुन काढण्यासाठी शेतकर्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मका पिकांची पेरणी केली होती.त्या अपेक्षेने सुरुवातीपासूनच चांगला पाऊस असल्याने मका पिक चांगले आलेही मात्र गेल्या पंधरवाड्यापासुन सतत व जोरदार पाऊस पडत असल्याने काही जमीनी उपळल्या असुन काही जमीनीत पाणी साचल्याने मका कापणीचा प्रश्न भेडसावत आहे. तर दुसरीकडे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणार्या डाळींबांनाही या अतीपावसाचा मोठ्या फटका बसला असुन शेतातील साचलेल्या पाण्यामुळे तेल्या व मररोगांसारखा प्रादुर्भाव होऊन झाडाला आलेली फळे गळून पडल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त मका व डाळींब उत्पादक शेतकर्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. दरम्यान येथील शेतकरी शैलेश नानाजी देवरे यांचे अडीच एकर डाळींबाचे क्षेत्र अतीपावसामुळे बाधीत झाल्याने डाळींब झाडावर तसेच फळांवर तेल्या, मररोग आदिंसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन काढणीला आलेले फळे पुर्णत: खराब होऊन गळून पडली आहेत. त्यामुळे डाळींब पिका पासुन मिळणारे उत्पन्न तर दूरच परंतु उत्पादनासाठी केलेले खचर्ही वाया गेला असुन अशा कितीतरी शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.