नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ झाली असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पन्नास टक्के भरले असून, अन्य धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे २९ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी १५ जुलै रोजी सर्व धरणांमध्ये ३६ टक्के पाणीसाठा होता, यंदा मात्र हेच प्रमाण २९ टक्के इतकेच आहे. तर गंगापूर धरणात ६५ टक्के पाणी होते, यंदा फक्त ५२ टक्के पाणी साठले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून सर्वदूर झोडपून काढल्याने नद्या, नाल्यांना पाणी आले असून, विशेष करून त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या २४ तासांत १२५ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम गोदावरीच्या व पर्यायाने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ होण्यास झाली आहे. अशीच परिस्थिती दारणाची असून, इगतपुरी तालुक्यात १९३ मिलीमीटर पाऊस झाला असून, त्यामुळे तालुक्यातील अन्य धरणांच्या पाण्यात वाढ होण्याबरोबरच दारणा धरणात ७१ टक्के पाणी साठले आहे. पावसाचा जोर कायम असल्याचे पाहून शुक्रवारी सकाळी दारणाधरणातून नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. पावसाच्या पुनरागमनाने धरणसाठ्यात होणारी वाढ पाहता जिल्ह्याचा पाणीप्रश्न काही अंशी सुटण्यास मदत झाली असून, गंगापूर धरण समूहात ४१ टक्के पाणी साठले आहे, तर पालखेड धरण समूहात अवघे नऊ टक्के पाणी आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाच्या सततच्या हजेरीने दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा व नांदुरमधमेश्वर या धरणांमध्ये एखूण ४२ टक्के पाणी साठले आहे. गिरणा खोऱ्यात २३ टक्के पाणी आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम असल्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
धरणसाठ्या वाढ, मात्र गतवर्षाच्या तुलनेत कमीच
By admin | Published: July 14, 2017 6:18 PM