नाशिक : तोतया साधू-महंत आणि महामंडलेश्वर यांना सिंहस्थ कुंभमेळ्यास येण्यास तीव्र विरोध करीत प्रतिबंध करण्यात येईल. तसेच देशभरातून साधू-महंतांचा साधुग्राममध्ये येण्याचा ओघ वाढला असून, नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. विशेषत: काही साधूंना अद्याप जागा उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे प्रशासनाने सदर समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर भारतात निरंजनी आखाड्याच्या वतीने एका कथित मद्य व्यावसायिकाला ‘महामंडलेश्वर सच्चिदानंद ’ पदवी प्रदान करण्यात आली, परंतु अशा प्रकारे कोणी पैसे देऊन भ्रष्ट माणूस साधूची पदवी मिळवित असेल तर त्याचा तीव्र निषेध करण्यात येईल. तसेच त्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिबंध करण्यात येईल, असेही ग्यानदास महाराज यांनी सांगितले. अशा प्रकारे साधू-महंतांमध्ये पदव्या देण्याची परंपरा आणि प्रथा नाही, परंतु असा कोणी गैरप्रकार करीत असेल तर अत्यंत चुकीचे आहे. त्याला कधीही मान्यता मिळू शकत नाही, असे सांगून त्यांनी साध्वी त्रिकाल भवन्ता यांच्यासंबंधी कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला. दरम्यान, गुुरुपौर्णिमेनंतर साधुग्राममध्ये साधू-महंतांचा ओघ वाढू लागला असून, त्यांच्या राहण्याच्या जागेची समस्या निर्माण होत आहे. सदर समस्या प्रशासनाने त्वरित सोडवावी. कारण निर्माेही, निर्वाणी आणि दिगंबर या तिन्ही आखाड्यांचे महंत आपल्याकडे या मागणीसाठी ठाण मांडून बसल्याचेही महाराजांनी सांगितले. येथील समस्येबाबत आपण महापौरांशी बोलणार असल्याचे ग्यानदास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अखिल भारतीय श्री निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास, महंत भक्तिचरणदास, राजेंद्रदास महाराज आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तोतया महामंडलेश्वरांना सिंहस्थात प्रतिबंध
By admin | Published: August 05, 2015 12:16 AM