नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. या पावसाने कांदा तसेच आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पालेभाज्यांनाही फटका बसला आहे. सुमारे ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्ह्यात गेल्या २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. जिल्ह्यातील ५४ गावांमधील सुमारे १२२४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. सटाणा आणि कळवण तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अत्यल्प आहे.
या अवकाळी पावसामुळे ३०२ हेक्टरवरील कांदा पिकाचे तसेच बाजरी, मिरची तसेच भाजीपाल्याचेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वार्षिक फळपिकांमध्ये आंबा पिकाचे नुकसान झाले. ४० हेक्टरवरील आंबा पिकाला याचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकूण ४५५.३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सटाणा, नांदगाव तसेच कळवण तालुक्याला अवकाळी फटका बसला आहे. त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील नुकसान सहन करावे लागले आहे.
कळवण तालुक्यातील २२१, नांदगावातील ९६, कळवणमधील २८८, त्र्यंबकेश्वरमधील १२५, इगतपुरीतील २४४ तसेच येवला तालुक्यातील २४३ शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. बागायती क्षेत्रावरील सुमेरे ४१५, तर वार्षिक फळपिके क्षेत्रावरील ४० असे एकूण ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चिंता लागली आहे.