मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांसह कांदा पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने अक्षरश: पिके भुईसपाट झाली आहेत. देवळा पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात सुरुवातीपासूनच या वर्षी पावसाने अक्षरश: कहर केला आहे. या भागातील तिन्ही हंगामातील प्रमुख पिक कांदा आहे. कांदयावरच या भागातील शेतकरीवर्गाचे अथर्कारण अवलंबून असते. मात्र या वर्षी पावसाने आणि रोगट हवामानाचा प्रतिकुल परिणाम कांदा रोपावर झाला आहे. यामुळे कांदा रोप मिळणे कठीण झाले आहे आणि शेतातील रोपं जगवण्यासाठी महागडी औषधे फवारणी करूनही फायदा झाला नाही. काही शेतकरी यांनी कसेबसे कांदा लागवड केलीही परंतु कांदा उगवण क्षमता कमी झाल्याने आणि उगवलेला कांदयावरच रोगराईचे आगमन झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिके नांगरणी करून पिके मोडून टाकलीत. अधूनमधून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे .कालच्या पावसाने तर काढणीवर आलेली बाजरी पिक भुईसपाट झाली आहेत त्यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणावर बाजरी पिकांची पेरणी करूनही शेतकरी यांना बाजरीचे उत्पन्न हाती मिळणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे. मका पिकांचीही मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभा असलेला मका शेतातच आडवा झाला आहे. भुईमूगाचेही नुकसान होत असुन खरीपाचे पिकांबरोबरच या भागातील नगदी पिक कांदा ही बळीराजास रडवू लागले आहेत. काल अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतातून पाणी वाहू लागले आहे. पाऊस असुनही पिके कोणतीच येणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.