नाशिक : नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात शनिवारी (दि.१६) चारचाकी कार घुसवून धुडगूस घालत तोडफोड केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवक सीमा ताजणे यांचा पती राजेंद्र ऊर्फ कन्नू ताजणे याच्यावर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात ताजणेविरोधात गुन्हा दाखल करण्याचा सोपस्कार पार पाडला असला तरी प्रत्यक्ष कारवाईत मात्र पोलिसांची उदासीनता दिसून येत असून, घटनेनंतर २४ तासांचा कालावधी उलटूनही ताजणेवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
राजेंद्र ऊर्फ कन्नू ताजणे याने शनिवारी सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास प्रवेशद्वाराची काच तोडून चारचाकी कार रुग्णालयात घुसवून धुडगूस घातला. तसेच गाडीतून खाली उतरल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी व परिचारिकांवर पेव्हर ब्लॉक फेकून मारला. रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांनाही मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणला. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारात शिवीगाळ व दमदाटी करून दहशत पसरवली. त्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची एकच धावपळ उडाली होती. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल विजय सोनवणे (४७ ) यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र ऊर्फ कन्नू ताजणे विरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासह वैद्यकीय सेवा, व्यक्ती व संस्था हिंसक कृती तसेच साथरोग सुधारणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्फो-
पोलिसांच्या कारवाईविषयी साशंकता
बिटको रुग्णालयात धुडगूस घातल्यानंतर कन्नू ताजणे फरार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नाशिक शहरात लॉकडाऊन लागू असताना ठिकठिकाणी पोलिसांचे चेकपोस्ट असताना कन्नू ताजणे याने वाहनासह पोलिसांना चकवा दिलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. बिटको रुग्णालयातही पोलीस बंदोबस्त तैनात असताना अशाप्रकारे रुग्णालयात हल्ला करून एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर पोलिसांकडून २४ तासांत कोणतीही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कारवाईविषयीही साशंकता निर्माण झाली आहे.