---------------------
महावितरणचा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
सिन्नर : घराची वीज जोडणी व मीटर बसविण्यासाठी ठेकेदारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, विभागाच्या पथकाने सापळा रचून लाचखोर कर्मचारी सुधाकर शिवदास सोनवणे यास ताब्यात घेतले. साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकरताना ही कारवाई करण्यात आली.
----------------
पांढुर्लीत रथसप्तमी उत्साहात
सिन्नर : मविप्र संचलित तालुक्यातील पांढुर्ली येथील जनता विद्यालयात रथसप्तमी व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संयुक्त साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक व्ही.पी. उकिरडे पर्यवेक्षक व्ही.एन. शिंदे यांनी प्रथम सूर्याला साक्षी ठेवून अर्ध्य दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले.
----------------
नांदूरशिंगोटे-तळेगाव रस्त्याचे डांबरीकरण
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर या दोेन तालुक्यांना जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे-तळेगाव रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा हद्दीतील अडीच किलोमीटर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील वाहनधारक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
-------------------
पांगरी परिसरात विद्युत पंपाची चोरी
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील वावी व पांगरी परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. पांगरी खुर्द येथील हिरामण शिंदे यांची जलपरी मोटार विहिरीतून चोरट्यांनी लांबविली, तसेच कृष्णा शिंदे यांचा विद्युत पंपाचा स्टार्टर चोरट्यांनी चोरून नेला.
---------------------
दापूर परिसरात बिबट्याची दहशत कायम
सिन्नर : तालुक्यातील दापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केल्याने येथील युवक जखमी झाला होता. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरा लावला आहे.