येवला : शहरालगत कॉलनी भागातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी विंचूर रस्त्यावरील पांजरापोळ गौशाळेतील जनावरांचा चारा ठेवण्याच्या जागी साठल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने तत्काळ या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, तसेच पाइपलाइन नदी पात्राला जोडून जनावरांची उपासमार थांबवावी, अशी मागणी गौशाळेच्या विश्वस्तांनी केली आहे. गौशाळा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जीवनलाल श्रीश्रीमाळ यांनी अनेकदा निवेदने देऊन ही बाब पालिकेच्या लक्षात आणून दिली; मात्र अजून कार्यवाही झालेली नाही. येवला शहरातील विंचूर रोडलगत असलेल्या कॉलनीवासीयांच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी अर्धवट पद्धतीने राबवल्या गेलेल्या भुयारी गटार योजनेच्या पाइपलाइनला जोडली आहे. त्यामुळे हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट गौशाळेच्या सर्व्हे नंबर ७३ अ मध्ये सोडले जाते. गौशाळा पांजरापोळ शेकडो जनावरे वर्षानुवर्षे सांभाळत आहे. जनावरांचा चारा ठेवण्याच्या जागी हे दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने पुरेसा चारादेखील ठेवण्यासाठी कोरडी जागा शिल्लक नसल्याने जनावरांची उपासमार होत आहे. भुयारी गटार योजनेलाच घरघर लागल्याने शहराच्या कॉलनी भागातून येणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लागली नाही. हे पाणी थेट नदीपात्रात सोडले गेले नसल्याने ही परवड झाली आहे. संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबवले जात असताना येवल्यात गौशाळेतील गौमातांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी हे पाणी साचले आहे त्या भागात विहीर आहे. याच विहिरीचे पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरले जाते. विहिरीचे पाणीदेखील खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पांजरापोळ जागेवर साठले दुर्गंधीयुक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:17 AM