नाशिक : ग्रीन अॅपल कॉर्पोरेशन नावाची कंपनी स्थापन करून दोघा भामट्यांनी मागील वर्षी आॅक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत एका महिलेला दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून तब्बल साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास ताब्यात घेतले आहे.सिमरण राकेश शर्मा (३२,दिंडोरी नाका) यांना ८ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत संशयित आरोपी संतोष माणिक आगवणे, प्रकाश बोंबले या दोघांनी दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून सुमारे साडेचार लाखांची फसवणूक केली. सिमरण शर्मा यांच्या फिर्यादीवरून संशयित संतोष माणिक आगवणे (रा. कदम मेन्शन) व प्रकाश बोंबले यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर पोलिसांनी संशयित आगवणे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.महात्मानगर परिसरात दोघा संशयितांनी ग्रीन अॅपल कॉर्पोरेशन कंपनी स्थापन केली. संशयितानी नागरिकांना पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. तर काहींना दरमहा दहा टक्के व्याज देण्याची भूलथाप दिली. काही नागरिकांनी आमिषाला बळी पडून पन्नास हजारांपासून ते पाच लाखांपर्यंतची रक्कम संशयितांच्या कं पनीत गुंतविली. शर्मा याच दामदुपटीच्या आमिषाला बळी पडल्या.भामट्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच शर्मा यांनी संशयितांविरोधात शनिवारी (दि.२६) गंगापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. यातील मुख्य संशयित आगवणे याला ताब्यात घेतले तर त्याचा दुसरा साथीदार बोंबले हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या गुन्ह्यात तक्रारदार वाढण्याची शक्यता असून, संशयितांनी अनेकांना अशाप्रकारे गंडा घातला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आगवणे याने यापूर्वीदेखील मुंबईत अशा पद्धतीने नागरिकांना फसविले असून, त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
दामदुप्पटचे आमिष; महिलेला लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:04 AM