लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नांदगाव व मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही ठिकाणी शेतपिकांचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी बंधारे फुटल्याने शेतात पाणी शिरले तसेच रस्तेही वाहून गेले. पुराच्या पाण्यामुळे शेळ्या, गायींना जलसमाधी मिळाली तर शेतातील उभे पीक आडवे झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. नुकसानाच्या प्राथमिक अंदाजानुसार, नांदगाव तालुक्यातील सुमारे २६ हजार हेक्टरवरील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.
मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने नाशिक जिल्ह्यातही पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, नांदगाव आणि मालेगाव या दोन तालुक्यांमध्येच तुफान अतिवृष्टी झाल्याने या दोन्ही तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नांदगावातील आ. मौजे साकारो येथील मोरखडी बंधारा फुटून लगतच्या शेतामध्ये पाणी शिरले. या पाण्यामुळे नांदगाव - पिलखोड हा राज्य महामार्ग बंद झाला होता. साकोरा येथील पोल्ट्री फार्ममध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे अंदाजे सात हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला तर पुराच्या पाण्यात ५ शेळ्या व एक गाय वाहून गेली.
नीरामनगर येथील सिमेंट प्लग बंधारा वाहून गेला आहे तर मौजे मोरझर येथील माती बांध पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला. मौजे मांडवड व दहेगाव या रस्त्यावरील बंधारा फुटून लगतच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मौजे जातेगाव येथील केटीआर बंधारादेखील फुटल्याने २० आर मक्याची शेती पाण्याखाली गेली आहे. जळगाव खुर्द येथील मातीबांध नालादेखील फुटल्याने शेतजमिनींचे नुकसान झाले. पिंपरखेड येथीलही नाला फुटला. गळमोडी येथील नदीवरील पूल पावसाने खचला आहे तर रणखेडा ते चांदारे या रस्त्याचा काही भाग पावसाच्या पाण्याने वाहून गेला. दऱ्हेल येथील तीन नाला बडींग फुटल्याने शेती व इतर नुकसान झाले. नांदुर ते निंबायती रस्त्याचा काही भाग पावसामुळे वाहून गेला आहे.
मालेगाव तालुक्यातदेखील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. साकुरी, जेऊर, पाथर्डे, निंबायती, जाटपाडे, निमगाव, आस्ताणे येथील शेत पिके आणि घरांचेदेखील नुकसान झाले आहे.
--इन्फो--
नांदगाव, मालेगाव तालुक्यात झालेला पाऊस
मंडलाचे नाव पर्जन्यमान (मि. मी.)
नांदगाव १२३
हिसवळ ८७
वेहेळगाव ७२
मनमाड ६५
जातेगाव ५७