नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पाझरतलाव व बंधारे तुडुंब भरले आहेत. नदी - नाले दुथडी भरुन वाहत असून समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहेत. तर काही भागात अद्यापपर्यंत शेतात पाणी साचलेले असल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. नांदूरशिंगोटेत दोन महिन्यात सरासरी 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.नांदूरशिंगोटे परिसरात गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी सुरुवातीलाच जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या भागात काही अपवाद वगळता नियमितपणे पावसाने हजेरी लावली आहे. नांदूरशिंगोटे, चास, मानोरी, कणकोरी, दोडी, दापूर, माळवाडी आदी भागातील छोटे मोठे बंधारे तुडुंब भरुन वाहत आहे. दरवर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पूरपाण्याने नांदूरशिंगोटे परिसरातील बंधारे, केटीवेअर, पाझरतलाव भरण्यात येतात. मात्र यावर्षी जुलै महिन्यातच पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्याने जामनदी दुथडी भरुन वाहत असल्याने पावसाचे पाणी पांगरी शिवारातील परिसरात पोहचले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.दमदार पावसामुळे सर्व नद्या, नाल्या, ओढे दुथडी भरुन वाहत होते. डोंगर पायथ्याशी असलेले छोटे- मोठे बंधारे भरून वाहत असल्याने नद्यांना पुर आला आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे येथे जुन महिन्यात 256 तर जुलै महिन्यात 303 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे दोन महिन्यात साडेपाचशे मिलीमीटर पावसाची नोंद येथील पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमान मापकावर झाली आहे. गेल्यावर्षी चारशे मिलीमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी प्रमाण जास्त आहे. पावसाने सर्वच ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षात न वाहिलेले अनेक ओढे व नाले देखील खळखळून वाहत असल्याने बळीराजा सुखावला आहे.