नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश मिळावा व प्रकल्प अधिकारी आशिर्वाद यांची बदली करावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्यावतीने सोमवारी आदिवासी विकास आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही वसतीगृहात प्रवेश मिळालेला नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहात असून, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसीतगृहात प्रवेश देण्यात यावा, दिडशे मुले व शंभर मुलींचे वाढीव वसतीगृह बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, नाशिाक प्रकल्प कार्यालयात अभ्यासू अधिकाऱ्याची नेमणूक करावी, प्रकल्प अधिकारी आशिर्वाद यांची बदली करावी, वसतीगृहातील विद्यार्थ्यांना भोजनासाठी सुरू करण्यात आलेली डीबीटी पद्धत बंद करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या असून, डीबीटी पद्धत बंद न झाल्यास १९ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात लकीभाऊ जाधव, गणेश गवळी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते.