नाशिक : निसर्गरम्य तालुका म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या इगतपुरी परिसरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. नाशिक-मुंबईपासून जवळ असलेल्या इगतपुरीमध्ये कल्याण, भार्इंदरच्या बारबालांना बोलावून एका रिसॉर्टमधील बंगल्याच्या आवारात रंगविलेली डान्स पार्टी पोलिसांनी उधळली. पोलिसांनी बारबालांसह दहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात असलेल्या मिस्टीक व्हॅली परिसरातील नऊ क्रमांकाच्या बंगल्याच्या परिसरात रस्त्यावर डीजेचा दणदणाट करुन बारबालांच्या नाच सुरू होता. या डान्सपार्टीचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या नाशिकमधील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयितांमध्ये एका कथित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.बंगल्याच्या आवारात तोकड्या कपड्यांमध्ये अश्लिल स्वरुपाचा धिंगाणा सुरू असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन साहेबराव देसले हे गस्तीवर असताना त्यांना या भागात हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्याला माहिती देऊन अधिक पोलीस बळ बोलावून संशयित ठिकाणी छापा टाकला. यावेळी बारबाला पायात घूंगरू बांधून तोकड्या कपड्यांवर नाचत असल्याचे आढळून आले. त्यांच्या अश्लील नृत्याचा आनंद घेणारे संशयित डॉ. राहूल मगनलाल जैन (३३,रा. बागमार भवन, नाशिक), अनिल लक्ष्मण बर्गे (४२. रा. जुने नाशिक), लक्ष्मण राजेंद्र पवार (३१, पेठरोड नाशिक) प्रकाश पांडुरंग गवळी (३३, पंचवटी ), अर्जुन दत्तात्रय कवडे (२३,मखमलाबाद नाशिक), बासू मोहन नाईक (४४, खडकाळी, जुने नाशिक), आकाश राजेंद्र गायकवाड (१९, रा. पाथर्डीफाटा, नाशिक), हर्षद विजयकुमार गोठी (२७, वासननगर, नाशिक), चेतन दत्तात्रय कवरे (३०, मखमलाबाद), काशी अनंतलाल पंडीत (३५, शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी मुंबई येथून सहा बारबालांना बोलावून डान्स पार्टी रंगविली होती. पोलिसांनी बारबालांसह दहा संश्यितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक एम.वाय.मांडवे करीत आहेत. एकूणच इगतपुरी हा परिसर निसर्गरम्य असून पर्यटनाच्या दृष्टीने हा तालुका अधिक विकसीत होत असताना अशा प्रकारे अवैधरित्या गैरकृत्याचे प्रकार वाढीस लागणे पर्यटनासाठी धोक्याचे ठरणारे असल्याचे बोलले जात आहे.