नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या महाअंतिम फेरीच्या स्पर्धांना बुधवारपासून प्रारंभ झाला. प्राथमिक गटाने पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सुरू झालेल्या या महोत्सवप्रसंगी नीलिमा पवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सांस्कृतिक महोत्सव सुरू केला आहे. त्यासोबतच इंग्रजी बोलता येण्यासाठी तसेच प्राथमिक स्तरापासून वक्तृत्व स्पर्धा यांसारखे उपक्रम संस्था राबवत असून, येत्या काही दिवसांत शनिवार हा विनादप्तराचा वार करणार असल्याची घोषणा नीलिमा पवार यांनी यावेळी केली. सदर वार हा अॅक्टीव्हीटी डे म्हणून साजरा करणार असल्याचेही श्रीमती पवार म्हणाल्या.या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डॉ. सुनील ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, नानाजी महाले, अशोक पवार, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, संस्थेचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे, प्रा. एस. के. शिंदे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. के. मुंगसे उपस्थित होते.प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती सविता जाधव व श्रीमती मंगला गुळे यांनी केले. २७ रोजी माध्यमिक विभागाच्या समूहगीत व वैयक्तिक नृत्य स्पर्धा तर २८ रोजी सकाळ व दुपार सत्रात माध्यमिक विभागाच्या वैयक्तिक गीतगायन व एकपात्री नाट्य प्रयोग होणार आहेत.प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले. वैयक्तिक नृत्य प्रकारात आदिवासी, भांगडा, शेतकरी, कोळी, धनगरी, गोंधळी, डोंगरी, पावरी आदी नृत्य प्रकार सादर करण्यात आले. चिमुकल्यांच्या या नृत्यांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. यावेळी परीक्षक म्हणून विद्या देशपांडे, संजीवनी कुलकर्णी उपस्थित होत्या. वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी प्राथमिक विभागाच्या ५० संघांनी सहभाग घेऊन नृत्य सादर केले.
सांस्कृतिक सोहळ्यात नृत्य स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:48 PM