नाशिक : रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाईसाठी केली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही कामगारांकडून दांडी मारण्याचा प्रकार सुरूच आहे. पंचवटी विभागात मंगळवारी (दि.३) ७० पैकी अवघे ८ कर्मचारी हजर असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने संबंधितांचे वेतन कापण्याचे आदेश दिले आहेत. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रात्रपाळीची सफाई सुरू होती. सकाळच्या सत्रात चार तास काम केल्यानंतर रात्री ६ ते १० या वेळेत चार तास काम सफाई कामगारांकडून करून घेतले जायचे. रात्रपाळीच्या सफाईवर महापालिकेकडून दरमहा ५० लाख रुपये अतिरिक्त खर्च व्हायचा. मागील पंचवार्षिक काळात विद्यमान सभागृहनेता दिनकर पाटील यांनी रात्रपाळीच्या सफाई कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार चालत असल्याचे निदर्शनास आणून देत सदर सफाई कायमस्वरूपी बंद करून टाकण्याची मागणी केली होती. रात्रपाळीत अनेक कामगार प्रत्यक्ष सफाई करतच नसल्याचे तर काही कामगारांकडून बदली कामगार पाठविले जात असल्याची तक्रारही पाटील यांनी केली होती. वारंवार मागणी करूनही रात्रपाळीची सफाई बंद होत नव्हती. अखेर, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर बेशिस्त सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगारला आणि रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सहाही विभागातील रात्रपाळीची सफाई बंद करून संबंधित कामगारांची नियुक्ती सायंकाळी ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाई कामांसाठी करण्यात आली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही अनेक कामगार दांडी मारत असल्याचे निदर्शनास येत आहे. पंचवटी विभागात मंगळवारी केवळ आठच कामगार हजर असल्याचे निदर्शनास आल्याने उर्वरित विनापरवानगी गैरहजर कामगारांचे वेतन कापण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नागरिक खूश, कामगार नाखूशमहापालिका आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने शहरात आता ठिकठिकाणी वेळेत सफाई होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु, यापूर्वी ज्या कामगारांकडून व्यवस्थेला वेठीस धरून गैरफायदा उठविला जात होता, त्यांची कमालीची कोंडी झाली आहे. त्यामुळे, कामाच्या वेळा बदलून घेण्यासाठी विभागीय अधिकाºयांसह प्रशासनावरही दबाव टाकला जात असल्याचे समजते.
सायंकाळच्या साफसफाईला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:08 AM