नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ६४०० कर्मचाऱ्यांसाठी मतदानप्रक्रियेविषयी प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (दि.५) तीन ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. दोन सत्रांत झालेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेला सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. उपस्थित कर्मचाऱ्यांना त्या-त्या प्रभागातील निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. महापालिका निवडणुकीसाठी १६०० पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यातील शिपाई वगळून ६४०० कर्मचाऱ्यांना रविवारी मतदानाच्या प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांत घेण्यात आले. सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम, कालिदास कलामंदिर आणि भाभानगर येथील कर्मवीर गायकवाड सभागृहात आयोजित या कार्यशाळेत उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदानप्रक्रिया कशी राबवायची, मतदान केंद्रात पार्टिशन कसे टाकायचे, इव्हीएम मशीन, बॅलेट युनिट कसे हाताळायचे, एकूणच मतदानप्रक्रिया कशी चालेल याविषयी माहिती देण्यात आली. प्रभागनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या दहाही निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले निरीक्षकही उपस्थित होते. तसेच मतदान केंद्राध्यक्ष व सहायक यांना मतदानप्रक्रियेविषयी पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण हे रविवार, दि. १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रशिक्षणाला दांडी
By admin | Published: February 06, 2017 12:20 AM