दुगारवाडी धबधबा ठरतोय धोकादायकसिडको : दरवर्षी पावसाळ्यात पावसाची मजा लुटण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधब्यावर तरुणांची गर्दी वाढत आहे. धबधब्यात पाय घसरून पडणे तसेच इतर कारणांनी अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने सदरचे ठिकाण हे धोकादायक बनले असून, याठिकाणी शासनाने लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.नाशिकपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे. दरवर्षी पावसाळ्यात पावसाची मजा लुटण्यासाठी नाशिक शहराबरोबरच सिडको, इंदिरानगर, अंबड यांसह परिसरातील तरुण याठिकाणी येत असतात. दुगारवाडीपासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर हा खोल धबधबा आहे. यामुळे धबधब्याजवळ जाण्यासाठी २ ते ३ किलोमीटर अंतरावरच आपली वाहने लावून ठेवावी लागतात. अत्यंत खोल असलेल्या या धबधब्यात तरुण आंघोळीदेखील करतात. परंतु धबधब्याच्या खोलाचा अभ्यास नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे संरक्षण व सुविधा नसलेला धबधबा हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे शासनाने याठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)धबधबा धोकादायक म्हणून घोषित करावा४युवासेनेने याबाबत महानगरप्रमुख पवन मटाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. यात सदरचा धबधबा हा धोकादायक बनला असून, शासनाने याठिकाणी कायम सुरक्षारक्षक नेमावे, तसेच सूचनाफलक लावून धोकेदायक जागेला संरक्षक तटबंदी करावी. याबरोबरच पोलिसांचे फिरते पथकही नेमावे. दरम्यान शासनाने मागण्यांबाबत विचार न केल्यास युवासेनेच्या वतीने शिवसेनास्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही मटाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी युवासेनेचे श्रेयस निराळी, राकेश चौधरी, मनोज सावंत, नितीन परदेशी, मयूरेश सहाणे, निखिल मोरे आदि उपस्थित होते.
दुगारवाडी धबधबा ठरतोय धोकादायक
By admin | Published: August 03, 2015 11:05 PM