नाशिक : गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरात थैमान घालणाऱ्या डेंग्यूच्या आजाराची तीव्रता आता कमी होत चालली असून, थंडीमुळे डासांची घनता कमी होऊन रुग्णसंख्येतही घट होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. शहरात जुलै-आॅगस्टपासून डेंग्यूच्या आजाराने थैमान घालत नाशिककरांची झोप उडविली. गेल्या चार महिन्यांत हजारांच्यावर रुग्ण डेंग्यूसदृश आढळून आले, तर ४३५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. डेंग्यूमुळे नगरसेवकाच्या पतीसह सात जणांचा बळीही गेला. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही डेंग्यूची तीव्रता लक्षात घेऊन शहरात एडीस डासांची अळी शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. शाळा, महाविद्यालये, वसतिगृह यासह घरोघरी जाऊन स्वच्छ पाण्याचे साठविलेले कंटेनर उलटे करण्यात आले, तर ठिकठिकाणी आढळून आलेल्या डासांच्या अळ्या नष्ट करण्यात आल्या. टायर्स जप्तीमोहीमही राबविण्यात आली. डेंग्यूची गंभीरता लक्षात घेता महापालिकेनेही विशेष महासभा बोलवत संबंधित विभागाला स्वच्छता मोहिमेसह उपाययोजनांचे आदेश दिले. आता गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असून, दोन दिवसांपासून तपमानाचा पारा ६.३ अंशापर्यंत खाली घसरल्याने थंडीमुळे डेंग्यूच्या डासांची घनताही ४.४ वरून ३.५ वर आल्याचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले. दि. १ ते १६ डिसेंबर दरम्यान १२६ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील १०८ नमुने प्राप्त झाले असून, ५७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील ४६ रुग्ण हे नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. थंडीमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन नैसर्गिकरीत्याच डेंग्यूवर नियंत्रण आले आहे. (प्रतिनिधी)
थंडीमुळे डेंग्यूवर मिळतेय नियंत्रण
By admin | Published: December 17, 2014 12:31 AM