सिन्नर : म्हाळुंगी नदीवर सर्वात मोठे भोजापूर धरण बांधल्यानंतर धरणाचे खालील बाजूस वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील सोनेवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी गावात येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पात्रातून जीव धोक्यात घालून त्यांना गावाशी संपर्क करावा लागत आहे. शासनामार्फत गेल्या ४७ वर्षात ठोस उपाययोजना न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तालुक्याच्या सोनेवाडी शिवारात म्हाळुंगी नदीवर सन १९७२ साली सर्वात मोठे मातीचे भोजापूर धरणाची निर्मिती झाली. धरणाच्या खालील बाजूस आदिवासी ठाकर समाजाची अंदाजे १२००च्या आसपास लोकसंख्या आहे. काळशेतवाडी, खटकळी, खड्याची वाडी, न्हाईनदरा अशी विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्यापैकी नदीच्या डाव्या तीरावरील खड्याची वाडी, न्हाईनदरा या भागातील आदिवासी बांधवांना सोनेवाडी गावशी संपर्क साधण्यासाठी किंवा गावात जाण्यासाठी रस्ता नाही. दोन्हीही वस्तीच्या ग्रामस्थांना पाऊल वाटेने जीव धोक्यात घालून धरणाचे सांडव्यावरून ंिकंवा धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर सांडव्याच्या आतील बाजूने गावांशी संपर्क करावा लागत आहे.भोजापूर धरण होण्यापूर्वी या भागातील ग्रामस्थांना गावात येण्या-जाण्यासाठी येथून रस्ता होता धरण झाल्यानंतर शासनामार्फत एकाही पक्क्या रस्त्याची व्यवस्था केली नसल्याने तेथील आदिवासी बांधवांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्याच्या दिवसात येथील ग्रामस्थांना सोनेवाडी गावात जाण्यासाठी चास-कासारवाडीमार्गे अंदाजे ८ ते १० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत असल्याचे भयानक वास्तव आहे. उन्हाळा व हिवाळ्याच्या दिवसातही पाऊलवाटेचाच वापर त्यांना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षाची असलेली अडचण लोकप्रतिनिधी व शासनाने लक्षात घेऊन पूल अथवा चांगल्या प्रतीच्या रस्त्याची गरज असल्याची भावना आदिवासी बांधव प्रकाश वारे, सीताराम उघडे, भारत उघडे, जगन वारघडे, बाजीराव गावंडे, पंढरीनाथ भले, भास्कर गावंडे, दगडू रावले, अमृता वारे, शंकर वारघडे, धोंडिबा भले, बबन मेंगाळ, नितीन गांगड, वाळीबा वारे आदींनी व्यक्त केली आहे. म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहिल्यानंतर गावात जाण्यासाठी रस्ता नसतो. नदीला गुडघाभर पाणी असल्याने चासमार्गे जावे लागते. नदीला पूर आला असल्याने गेल्या १३ ते १४ दिवसांपासून वाडी-वस्तीवरील मुले कासारवाडी येथे शाळेत जाऊ शकलेली नाहीत. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.- सीताराम उघडे, ग्रामस्थ. वाडी व वस्ती परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना पावसाळ्यात नदीच्या पात्रातील पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे जीव धोक्यात घालून पावसाळ्यात अशीच तारेवरची कसरत करावी लागते. सोनेवाडी गावात शासकीय काम किंवा दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो.-भारत उघडे, ग्रामस्थ.
जीव धोक्यात घालून करावी लागते नदीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:51 AM
सिन्नर : म्हाळुंगी नदीवर सर्वात मोठे भोजापूर धरण बांधल्यानंतर धरणाचे खालील बाजूस वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील सोनेवाडी येथील आदिवासी बांधवांसाठी गावात येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पात्रातून जीव धोक्यात घालून त्यांना गावाशी संपर्क करावा लागत आहे. शासनामार्फत गेल्या ४७ वर्षात ठोस उपाययोजना न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देसोनेवाडीच्या ग्रामस्थांची व्यथा : रस्ताच नसल्याने संपर्कात अडचणी