नाशिक : ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी होणारे अवैध उत्खनन रोखण्यासाठी पावले उचलली जात असतानाच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अवैध उत्खनन राेखण्याचेदेखील प्रशासनापुढे आव्हान असणार आहे. ब्रह्मगिरीच्या रक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनेक उपसमित्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून, त्यातील काही समित्यांनी प्रशासनाला याबबातचा अहवालही सादर केला आहे.
राज्यात पर्यटन दिन साजरा होत असताना नाशिकमध्ये अवैध उत्खनन, तसेच इको सेन्सेटिव्ह झोनमधील अवैध बांधकामाचा मुद्या चर्चेत येत आहे. खुद्द पर्याववरण राज्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घातल्याने किमान शासकीय अधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची एक समिती स्थापन होऊ शकली. त्यामुळे संतोषा, भागडी येथील उत्खनन रोखण्यावर भर दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यात अन्य पाच ते सात ठिकाणी डोंगर, टेकड्यांवरदेखील उत्खनन होत असताना तेथेही लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सुरगाणा येथील हतगड, दुर्ग हरिहर त्र्यंबकेश्वर, गिरणारे जवळील धोंडेगाव, आळंदी धरणालगतची टेकडी, रामशेज डोंगराजवळ पाच ठिकाणी सुरू असलेले खोदकाम, दिंडोरी रोडवरील विद्यापीठाजवळील डोंगर, आदी अनेक ठिकाणी नैसर्गिक डोंगरांना नख लावण्याचे उद्योग सुरू असल्याने याबाबतचे उत्तर पर्यावरण प्रेमींकडून विचारले जात आहे. महसूल यंत्रणेची परवानगी आणि वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगर, टेकडी असा प्रशासकीय मुद्या उपस्थित होत असल्याने एकीकडे कामे सुरू, तर दुसरीकडे शासकीय चौकशा आणि बैठका होत असल्याचा अनुभव असल्याने काही बाबी दुर्लक्षित होत असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लोप पावण्याची भीती उपसिमत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
--इन्फो--
वनांना लागणाऱ्या आगी संशयास्पद
नााशिक जिल्ह्यातही अनेकदा वनसंपदेला आग लागल्याच्या घटना घडतात. मात्र, अशा आगींची चौकशी होणे अपेक्षित असल्याचे काही पर्यावरणप्रेमींनी सुचविलेले आहे. अनेकदा जंगलांमध्ये वणवा लागल्याच्या घडतात याबाबत असलेला संशयकल्लोळ टास्कफोर्सच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे समजते. वणव्यामुळे वनसंपदा बेचिराख होतेच, शिवाय जमीन नापीक होण्याचा धोका वाढतो. जैवविविधताही धोक्यात येते. पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावर या बाबीही पर्यावरणाशी निगडित असल्याने संशोधनाचा विषय व्यापक करण्याचा सल्लादेखील काही उपसमित्यांनी दिला आहे.