तपोवन रस्त्यावर फलक लावण्याची मागणी
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील विजय ममता सिग्नलजवळून अवजड वाहने तपोवन मार्गाकडे वळविली जात असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. काही वेळा या वाहनचालकांना रस्त्याची माहिती नसल्याने त्यांची दिशाभूल होते. यासाठी या मार्गावर दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
झोपडपट्टी भागात डासांचा प्रादुर्भाव
नाशिक : शहरातील झोपडपट्टी भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात धूर फवारणी होत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. सायंकाळी डासांचा उपद्रव वाढत असल्याने नागरिकांना झोपणे अवघड होते. महापालिकेने परिसरात स्वच्छता करून औषध फवारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
रस्त्यावर पडलेले खांब धोकादायक
नाशिक : स्मार्ट रोड योजनेंतर्गत त्र्यंबक रोडवर तयार करण्यात येणाऱ्या पादचारी मार्गासाठी वीज वितरण कंपनीचे अनेक खांब जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर पडलेले आहेत. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या या खांबांमुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी चालणारांच्या ते लवकर लक्षात येत नाही. हे खांब त्वरित इतरत्र हलविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
अनेक नागरिकांचे मास्ककडे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील विविध मार्गांवर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिक गर्दीत फिरताना तोंडाला मास्क लावत नाहीत. त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंगकडेही दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाची भीती संपली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. बाहेर फिरताना नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.