नाशिक : शहराच्या अगदीजवळ असलेल्या पेठरोडवरील नामको रुग्णालयाच्या आवारात बिबट्याने संचार करत थेट स्वागतकक्षापर्यंत गुरूवारी (दि.६) मध्यरात्री ‘एन्ट्री’ मारली. सुदैवाने यावेळी येथील काचेचा दरवाजा बंद असल्यामुळे बिबट्या माघारी फिरला अन् पायऱ्या उतरून पुन्हा बाहेर पळून गेल्याने अनर्थ टळला.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात सर्वत्र लॉकडाउनची स्थिती असल्यामुळे संध्याकाळी सर्वत्र लवकरच सामसूम पसरत आहे. मागील दीड महिन्यांपासून नागरिकांची वर्दळ शहरातील विविध रस्त्यांवरून अचानकपणे कमी झाल्यामुळे वन्यजीवांचा मुक्तपणे वावर वाढला आहे. दारणा नदीकाठालगतच्या गावांमध्येही बिबट्याचा संचारासोबत हल्लेदेखील वाढले आहे. हिंगणवेढे, दोनवाडे या गावांमध्ये दोघा मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यूदेखील मागील पंधरवड्यात झाला.
पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या नामको रुग्णालयाच्या इमारतीच्या आवारात रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्याने एन्ट्री केली. बिबट्याचा संचार येथील सीसीटीव्ही कॅमेºयात पुर्णपणे कैद झाला. बिबट्या मुख्य दरवाजातून आत येतो आणि स्वागतकक्षाजवळच्या काचेच्या दरवाजापुढे येऊन मान वळवितो दरवाजा बंद असल्याचे लक्षात येताच काचेत आपलेच प्रतिबिंब दिसल्याने अगदी काही सेकंदात बिबट्या पळत पुन्हा रूग्णालयाच्या पाय-या उतरून बाहेर धूम ठोकतो, त्याच्या संचाराचा हा क्रम सीसीटीव्ही फुटेजमधून सहज दिसून येतो.पहिल्या मजल्यावरील सुरक्षारक्षकाच्या ही बाब लक्षात येताच ते तत्काळ अन्य सुरक्षारक्षकांना याबाबत सतर्क करतात. सुरक्षारक्षक दारे-खिडक्या झटपट बंद करून घेत पंचवटी पोलीसांसह अग्निशमन दल व वनविभागाला घटनेची माहिती कळवितात. काही सेकंदात वनविभागाची गस्तीपथकाचे वाहनचालक प्रवीण राठोड यांना घेऊन अंजनेरी परिमंडळाचे रात्रपाळीवर असलेले वनपाल सुजीत बोकडे, वनरक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे तत्काळ रुग्णालयात पोहचतात. तोपर्यंत पोलिसांचे गस्तीपथकासह अग्निशमन दलाचे जवानही दाखल होतात; मात्र बिबट्याने रुग्णालयाच्या परिसरातून पुन्हा मखमलाबादच्या डाव्या तट कालव्याच्या दिशेने पलायन केलेले होते.वनविभागाच्या गस्तीपथकाने बिबट्याचा येथील मळे भागात शोध घेतला मात्र यावेळी कोठेही बिबट्याने कोणालाही दर्शन दिल्याची माहिती मिळू शकलेली नाही. सुदैवाने रुग्णालयाचा काचेचा दरवाजा बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा बिबट्याने रुग्णालयात धुमाकूळ घातला असता. नामको रुग्णालयाच्या आवारात कॅन्सर विभाग, रु ग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी निवास-भोजनाकरिताचे सेवा सदन आणि परिचारिका महाविद्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते.दाट लोकवस्तीमुळे धोका अधिकनामको रुग्णालय परिसरात कर्णनगर, अश्वमेघनगर, सप्तरंग सोसायटी आदींसह विविध उपनगरी कॉलन्यांचा परिसर असून दाट लोकवस्ती आहे. तसेच जवळच शरदचंद्र पवार बाजारसमितीही आहे. बाजारसमितीत दररोज शेकडो नागरिकांचा वावर असतो वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात त्याच्या वावर असल्याच्या खाणाखूना शोधून योग्य त्या ठिकाणी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.दाट लोकवस्तीजवळ हे रुग्णालय असून तेथे बिबट्या येणे ही बाब नक्कीच धोकादायक असून वनविभागाला याची पुर्णपणे जाणीव आहे; मात्र नागरिकांनी घाबरून न जाता कुठल्याहीप्रकारे अफवा पसरवू नये, लॉकडाउनच्या काळात कुठलीही अन्य अपात्कालीन स्थितीला निमंत्रण देऊ नये. वनविभागाच्या पथकाला सहकार्य करावे, लवकरच पिंजरा लावून बिबट्या जेरबंद केले जाईल, त्यादृष्टीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू झाले आहे.- विवेक भदाणे, वनक्षेत्रपाल, नाशिक पश्चिम