मालेगाव : शहरातील सराफ बाजारातील हनुमान मंदिराजवळील मनपाने धोकेदायक ठरवलेली दुमजली इमारत शुक्रवारी (दि.४) दुपारी ४ वाजता कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
शहरातील सराफ बाजारातील घनश्याम वर्मा यांच्या मालकीची ही इमारत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेने या इमारतीला धोकेदायक ठरवले होते. तशी नोटीसही शर्मा यांना बजावली होती. मात्र या इमारतीत भाडेकरू राहत होता. भाडेकरूने इमारत सोडण्यास नकार दिला होता. इमारत कोसळल्यामुळे त्याचेही संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे तसेच इमारत शेजारी असलेली हात गाडीचे नुकसान झाले. घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन रस्त्यावरील ढिगारा बाजूला केला होता. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. याप्रकरणी मनपाने नोंद घेतली आहे.