नाशिक: जुने नाशिकमधील डिंगरअळी भागात असलेल्या धोकेदायक वाड्यांचा भाग ढासळण्याचे सत्र सुरुच आहे. रविवारी (दि.१९) मध्यरात्रीच्या सुमारास जंत्रे गल्ली परिसरात असलेला पडीक लहाने वाड्याची भींत कोसळली. सुदैवाने या वाड्यात कोणीही मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास नसल्याने अनर्थ टळला.
जुने नाशिकमधील धोकादायक झालेल्या वाड्यांचा भाग कोसळण्याच्या घटना लागोपाठ सुरूच आहे. याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. जुुने नाशिक परिसरातील डिंगरअळीचा परिसर हा गावठाणाचा भाग आहे. या भागात धोकादायक वाड्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये बहुतांश वाड्यांमध्ये कोणीही रहिवासी वास्तव्यास नाहीत तर काही वाड्यांमध्ये कुटुंबे वास्तव्यास आहेत. जोशी, आंबाडकर यांच्या मालकीचा हा वाडा असल्याचे समजते. यापूर्वी महापालिका प्रशासनाने आंबाडकर व जोशी वाड्याला धोकादायक म्हणून घोषित करून नोटीसही बजावली होती. या वाड्याच्या भींतीचा मोठा भाग कोसळला. यानंतर पुन्हा रविवारी मध्यरात्रीच्य सुमारास येथून पुढे काही मीटरवर असलेल्या लहाने वाड्याचीही भींत ढासळली. विटा मातीचा खच रस्त्यावर पसरला होता.
हा भाग अरूंद गल्लीबोळांचा असून लहान मुले या भागात रस्त्यांवर खेळत असतात. पावसाच्या संततधारेमुळे धोकादायक वाड्यांचा मोठा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडण्याची भीती रहिवाशांमध्ये व्यक्त केली जात आहे.जुन्या नाशकातील १६ धोकादायक वाड्यांमधून रहिवाशांना महापालिकेने स्थलांतरित करून घेत वाडे रिकामे केले आहेत. वाडे पडण्याच्या घटना थांबत नसल्याने या भागात सतर्कतेचा इशारा देणारे सुचनाफलक तरी महापालिकेने लावावेत, अशी मागणी होत आहे.