पाथर्डी फाटा : वाहनांच्या गतीला नियंत्रित करण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत; मात्र या गतिरोधकांचा आकार एकसारखा नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत असल्याची तक्रार होत आहे. शहरात तयार करण्यात आलेल्या सहापदरी महामार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे. शहरातील मध्यवस्तीतून जाणाऱ्या महामार्गावर गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी, नागरिक, शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र या गतिरोधकांचा आकार कुठे कमी तर कुठे अधिक असल्याने गतिरोधकच अपघाताला निमंत्रण देत असल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. काही ठिकाणी अगदी उंच गतिरोधक करण्यात आले आहेत. त्यामुळे कित्येक दुचाकींचे नुकसान होत असल्याची तक्रार आहे. तर काही ठिकाणी गतिरोधक निव्वळ नावालाच असून गतिरोधक रस्त्याच्या समांतर आले आहेत. महामार्गावरून पिंपळगावकडे जाताना तसेच गोंदे वसाहतीकडे जाताना अनेक ठिकाणी गतिरोधक लागतात. मात्र हे गतिरोधक समप्रमाणात नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पाथर्डी फाटा, हॉटेल ताज, फाळकेस्मारक, विल्होळी, आठवा मैल, वाडीवऱ्हे, गोंदे या ठिकाणी रस्त्यांवर टाकण्यात आलेले गतिरोधक हे आकाराने मोठे असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काही मार्गांवर तर ठरावीक अंतराने पाच ते आठपर्यंत गतिरोधक असल्याने वाहनधारकांना गतिरोधकच अडथळा वाटू लागले आहेत. गतिरोधक कसे असावेत याबाबतचे निकष असतानाही केवळ मागणीचा विचार करून गतिरोधक रात्रीतून उभारण्यात येतात, मात्र नंतर हेच गतिरोधक अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. काही दिवसांपूर्वीच उपनगर-लोखंडे मळा रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात आले होते. सदर गतिरोधक धोकादायक ठरू लागल्यानंतर या गतिरोधकाच्या मधल्या भागात डांबराचे थर टाकण्यात आले. असाच प्रकार शहरात अनेक ठिकाणी घडला आहे. गतिरोधक टाकताना त्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी असावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गतिरोधक हे नियमानुसार असावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
महामार्गावरील गतिरोधक ठरताहेत धोकेदायक
By admin | Published: February 24, 2016 10:57 PM