नाशिक : एसटी महामंडळाच्या सीबीएस, महामार्ग बसस्थानक हद्दीत सात मोठे अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्ज असून, ते हटविण्यासाठी मनपा प्रशासनाने एसटीच्या नाशिक विभागाला तीनदा नोटीस बजावली. मात्र, त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असून, पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आता पोलिस आयुक्तांनी याप्रकरणी एसटी महामंडळावर गुन्हे दाखल करावे, असे पत्र पाठवणार आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मुंबईमध्ये होर्डिंग कोसळून १४ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक शहरातील धोकादायक होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळले. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाही अलर्ट मोडवर आहे.
शहरातील खासगी जागेवरील होर्डिंग्जचे आठ महिन्यांपूर्वीच त्रयस्थ संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले आहे. मात्र, शहरात एसटी महामंडळाच्या बसस्थानकातील अनेक होर्डिंग्ज धोकादायक असल्याचे समोर आले आहे. त्यात सीबीएस बसस्थानकात चार, महामार्ग बसस्थानकात दोन, तर पंचवटी डेपोतील एक होर्डिंग स्ट्रक्चर अत्यंत धोकादायक असून, त्यांचा आकारही मोठा आहे. शिवाय हे होर्डिंग पत्र्याचे असून, पावसाळ्यात जोरदार वाऱ्यात त्यांचा पत्रा कोसळण्याची भीती आहे. मनपाने दोनदा नोटीस बजावली आहे. परंतु, तरीदेखील एसटी महामंडळाने प्रतिसाद दिला नाही.
होर्डिंग्ज एसटी महामंडळाच्या बसस्थानकांच्या हद्दीत असल्याने मनपाला थेट कारवाई करता येत नाही. सलग तिसऱ्यांदा नोटीस बजावूनही कारवाई होत नसल्याने मनपा प्रशासन पोलिस यंत्रणेची मदत घेणार आहे. होर्डिंग्ज कोसळून दुर्घटनेत मोठी जीवित व वित्त हानी होण्याची भीती असल्याने नोटीस बजावूनही प्रतिसाद दिला जात नसल्याने पोलिस आयुक्तांनी एसटी महामंडळावर गुन्हे दाखल करावेत, असे पत्र लवकरच पाठवणार आहे.