देवळा : शहर व परिसरातील जुन्या झालेल्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारा तुटून वारंवार अपघात होत असल्यामुळे वीज कंपनीने तातडीने दुरु स्ती करून नवीन वीज वाहक तारा टाकण्याची मागणी राष्टवादी कॉँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे.नासिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल अहेर यांनी वीज कंपनीचे उप कार्यकारी अभियंता टेंभुर्णे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ कार्यान्वित झाल्यानंतर १९६७ मध्ये देवळा शहर व परिसरात टाकण्यात आलेल्या उच्च वीज वाहक तारा तशाच आहेत. ५१ वर्षांपासून या वीज वाहक तारा बदलण्यात आलेल्या नसल्यामुळे त्या जीर्ण व कमकुवत झाल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात किंवा वादळामुळे त्या नेहमी तुटण्याच्या घटना घडत असतात. त्यातून अनेक अपघात झाले आहेत. वीज कंपनी तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेते. सोमवारी (दि.८) सायंकाळी देवळा वाजगाव रस्त्यालगत राहणारे परशराम अहेर ह्या शेतकऱ्याच्या गोठ्यावर उच्च दाबाची वीज वाहक तार तुटून पडल्यामुळे विजेचा धक्का बसून तीन म्हशी, व एक गाय मृत्युमुखी पडली. यामुळे अहेर यांचे साडेसहा लाख रु पयांचे नुकसान झाले. भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी वीज कंपनीने जीर्ण झालेल्या सर्व वीज वाहक तारा त्वरीत बदलून नवीन टाकाव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल अहेर, शहर अध्यक्ष जितेंद्र अहेर, संतोष शिंदे, सचिन सुर्यवंशी, लक्ष्मीकांत अहेर यांच्या स्वाक्ष-या आहेत.
जुन्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारा धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 4:39 PM
देवळा शहर : तारा बदलण्याची राष्टवादीची मागणी
ठळक मुद्दे५१ वर्षांपासून या वीज वाहक तारा बदलण्यात आलेल्या नसल्यामुळे त्या जीर्ण व कमकुवत झाल्या आहेत.