नाशिक : जुनी महापालिका इमारत तसेच सध्याचे पूर्व विभागाचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीचा धोकादायक झालेला भाग पावसामुळे अखेर आज सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कोसळला. इमारतीच्या दर्शनी भागाच्या दगडी भिंतीला तडे गेल्याने हा भाग धोकादायक झाला होता. दुपारी उंचावरून काही दगड खाली कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही धाव घेऊन पाहणी केली.मेनरोडवर महापालिकेची जुनी इमारत ब्रिटिशकालीन असून, ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपूर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तुला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरुवातीला हे मुख्यालय होते. त्यानंतर पूर्व विभागाचे कार्यालय अशी नवी ओळख या दगडी इमारतीला मिळाली. इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीबाबत प्रशासनाने कधीही लक्ष पुरविणे गरजेचे समजले नाही. दगडी इमारतीत पक्ष्यांच्या विष्ठेतून रोपे उगवून त्यांची वाढदेखील झाली, मात्र सदर रोपे काढण्याबाबतही महापालिकेने कधी पुढाकार घेतला नाही. वर्षानुवर्षांपासून या इमारतीची दुरवस्था वाढीस लागत आहे. काही ठिकाणची चुनखडीदेखील निघून गेली आहे. यामुळे भिंतीला मोठा तडा गेलेला असताना तो भाग आज दुपारच्या सुमारास कोसळला. या इमारतीला लागून बहुसंख्य विक्रेते आपला व्यवसाय करतात. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. दुपारच्या सुमारास इमारतीचे वरील बाजूने काही दगड कोसळले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली. विक्रेत्यांनी तत्काळ आपला ‘बिºहाड’ आवरता घेतला.मेनरोड ही शहराची अत्यंत जुनी व महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. गावठाण भाग असल्यामुळे या भागात येणारे रस्ते अरुंद व दाटीचे आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यास त्यामुळे मोठा अडथळा निर्माण होतो. महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय चालविल्या जाणाºया या दगडी इमारतीची अवस्था बिकट असून, दगडी भाग निखळून कोसळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे...तर स्थलांतर होणारमहापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालय ज्या इमारतीत भरते त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही इमारत धोकादायक ठरली तर त्यातील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्रकारांना दिली. महापालिकेची ही इमारत अत्यंत जुनी असून, त्यामुळे इमारतीला अनेक तडे गेले आहेत. त्यामुळे ही इमारत धोकादायक आहे. द्वारका येथे नवीन कार्यालय बांधण्याचे नियोजन आहे. मात्र अद्याप या प्रस्तावाला गती मिळालेली नाही.
मनपाच्या जुन्या इमारतीचा धोकादायक भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:24 AM