सटाणा : बागलाण तालुक्यात आजही पुल व रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. पुल अभावी आजही मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, करंजाडी या नद्यांवर योग्य पुल नसल्यामुळे तसेच आहेत ते पुल धोकेदायक बनल्याने पावसाळ्यात खेड्यापाड्यांचा संपर्क तुटून ग्रामीण भागाचे दळणवळण ठप्प होत आहे. ही पावसाळ्यातील मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे शासनाने पुलांचा अनुशेष भरून काढल्यास बागलाण मधील रस्त्यांचे जाळे भक्कम होऊन विकासाला मोठा हातभार लागणार आहे.बागलाण तालुक्यातील भडाणे, पिंपळकोठे, दरेगाव, नांदीन, तांदुळवाडी, धुळे जिल्ह्याला जोडणारी पिसोळबारी, वाडीपिसोळ, मेंढीपाडे, जयपूर, श्रीपूरवडे, टिंगरी, बिलपुरी, बोढरी, तळवाडे ही गावे मोसम नदीच्या उत्तरेकडील सोळा गाव काटवन मध्ये येणारी आहेत. दळणवळण सुरळीत व्हावे म्हणून आणि साक्र ी तालुक्याकडे जाणारा जवळच मार्ग म्हणून सोमपूर नजीक मोसम नदीपात्रावर गेल्या वीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला. मात्र नदीचे पात्र मोठे असतांना सुरुवातील कमी गाळ्याचा पूल बांधण्यात आला. यामुळे नदीला पावसाळ्यात आलेल्या पुरात भराव वाहून गेल्यामुळे वाहतूकठप्प होऊन गावांचा संपर्क तुटला. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकून वाहतूक सुरळीत केली मात्र पुन्हा एक वर्षांनी तीच डोकेदुखी. यामुळे पुन्हा तीन गाळे वाढविण्यात आले. हत्ती नदीवर धोका कायम बागलाण तालुक्यातील वनोली, चौंधाणे रस्त्यावरील हत्ती नदीवरील पुल पूर्णपणे धोकेदायक बनला आहे .गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी लाखो रु पये खर्चून पुल उभारण्यात आला होता .मात्र निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अतिशय धोकेदायक बनला आहे .पुल अक्षरश: वाळूच्या आधारावर असल्यामुळे केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते .हा मार्ग पश्चिम भागातील २५ ते ३० गावांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. हा पुल धोकेदायक बनल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांना वीस किलोमीटरचा फेरा मारून वीरगाव व वनोलीकडे जावे लागत आहे.जायखेडा, मुल्हेर, वाघळे येथील मोसम नदीपात्रावरील फरशी पुलांची डोकेदुखी नेहमीची आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास हे चारही फरशी पूल पाण्याखाली जावून गावांचा संपर्क तुटत असतो.शासनाने या मार्गावरील वाहनाच्या वर्दळीचा विचार करून उंच पूल उभारण्याची गरज आहे. सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौधाणे गावानजीक असलेल्या पुलाची देखील अत्यंत दुरवस्था झाली आहे. कळवण तालुका व गुजरातला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. यंदा पहिल्याच पावसात या पुलाची रेलिंग तुटल्याने सदर पुल वाहतुकीसाठी अतिशय धोकेदायक बनला आहे. या पुलाची उंची तसेच रु ंदी वाढविणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे.
जीर्ण पुलांमुळे प्रवास धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:03 PM