देवळा : देवळा-कळवण रस्त्यावर रामराव हौसिंग सोसायटी परिसरात रस्त्याच्या लगत बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेली धोकादायक झाडे काढून टाकण्याकडेही दुर्लक्ष होत असल्यामुळे ही झाडे कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मृत झाडे काढून टाकण्याची मागणी नागरिक करत येत आहे.
सौंदाणे - वघई राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. या मार्गावरील देवळा कळवण रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार असल्यामुळे कांद्याने भरलेले ट्रॅक्टर, पायी जाणारे शेतकरी तसेच नागरिकांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर निष्पर्ण झालेली जुनी, वयस्कर वाळलेली झाडे आहेत. ही झाडे केव्हा उन्मळून पडतील, याचा नेम नसल्यामुळे वृक्ष कोसळून अपघात होऊ शकतो. ही झाडे काढून टाकण्यासाठी केलेल्या तक्रारींकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन ही धोकादायक झाडे काढून टाकावीत, अशी मागणी मविप्रचे संचालक डॉ. विश्राम निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, कौतिक हिरे, डॉ. वसंत आहेर, सुरेश आहेर आदींसह नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत रस्त्यालगत असलेल्या झाडांची पाहणी करून वाळलेली अथवा मृत झालेल्या झाडांची विक्री करून त्या जागेवर पुन्हा नवीन वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवण्याच्या जबाबदारीचे संबंधित अधिकारी कोणतेही पालन करत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------
देवळा कळवण रस्त्याने पहाटेच्या वेळेस शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मॉर्निंग वॉकसाठी नियमित जातात. या रस्त्यावर तीन ते चार वाळलेली झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या झाडांच्या वाळलेल्या शाखा मोडून रस्त्यावर पडल्याची घटना यापूर्वी घडलेली आहे. बांधकाम विभागाने मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच हे वृक्ष काढून टाकावेत.
हितेंद्र आहेर, प्राचार्य, देवळा (०२ देवळा १)
020921\02nsk_23_02092021_13.jpg
०२ देवळा १