नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने ३४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. दरम्यान, शहरातील डॉक्टर्स, पॅथॅलॉजिस्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर्स यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महापालिकेने शुक्रवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवन येथे बोलाविली असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.शहरात गेल्या आठवड्यापासून डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असून, सिडको, सातपूर आणि जेलरोड परिसरात त्याचा प्रभाव सर्वाधिक आहे. आतापर्यंत १७४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने ३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने रोज किमान ५० ते १०० घरांना भेटी देऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांकडून माहिती संकलित करायची असून, त्यांचे प्रबोधनही करायचे आहे. झोपडपट्टी आणि सार्वजनिक ठिकाणी सर्व्हे केला जात आहे. डेंग्यूचे निदान आणि त्यासंबंधीच्या तपासणीसंबंधीची माहिती देण्यासाठी शहरातील डॉक्टर्स, पॅथॅलॉजिस्ट यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी बोलाविण्यात आली असून, रुग्ण दाखल होताच रिर्पाेटिंग करण्याचेही आदेश यावेळी संबंधितांना दिले जाणार आहेत. याशिवाय मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कंटेनर तपासणी मोहीम हाती घेऊन डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत. दरम्यान, शहरातील खासगी डॉक्टरांकडून रुग्णांचे पूर्ण निदान होण्यापूर्वीच डेंग्यू संशयित म्हणून जाहीर केले जात असल्याने त्यावर महापालिकेने चाप लावण्याचे ठरविले आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचा ताप वाढणार
By admin | Published: July 21, 2016 11:16 PM