ममदापूर : येवला तालुक्यातील ममदापूर येथील युवकाला येवल्याच्या बाजाराला जाणे चांगलेच महाग पडले आहे. वीस वर्षीय तरु ण बापू बाबासाहेब गुडघे हा दातावर उपचार करण्यासाठी आपल्या दुचाकीवरून दवाखान्यात जात असताना येवला येथील विंचूर चौफुलीवर मोटर सायकल मध्ये पतंगाचा मांजा अडकला आणि मांजाने युवकाचा कानच मागील बाजूने कापला गेला.येवल्यात मकरसंक्रांतीला पतंगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे मंगळवारी (दि.१५) येवल्याचे आकाश पतंगांनी व्यापले होते. सदर युवक दातावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात आपल्या मोटारसायकलवरून निघाला होता. परंतु, विंचूर चौफुलीवर पतंगाचा मांज्याने त्याचा घात केला आणि कानामागील भाग कापला गेला. गुडघे याने लागलीच आपली गाडी थांबवून झालेला प्रकार जवळील लोकांना सांगितला तोपर्यंत त्याचा कान पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता काही लोकांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रु ग्णालय येवला येथे नेले व गुडघे याच्या नातेवाईकांना खबर दिली. गुडघे याच्या कानाला पाच टाके घालण्यात आले आहेत. दातावर ईलाज करण्यासाठी निघालेल्या तरु णाला कानावरती ईलाज करून घरी यावे लागले, त्यामुळे या घटनेची चर्चा रंगली आहे. दरम्यान, शासनाने नॉयलॉन मांजावर बंदी घालूनही पतंगबाजीत त्याचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात त्यावर नियंत्रण नसल्याने अशा घटना घडत आहेत.
दंतोपचारासाठी गेला; कान कापून आला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 4:55 PM
मांजाने केला घात : नॉयलान मांजाचा सर्रास वापर
ठळक मुद्देशासनाने नॉयलॉन मांजावर बंदी घालूनही पतंगबाजीत त्याचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे.