सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील ग्रामदैवत व सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोठेबाबा यात्रोत्सवास सोमवारी (दि. २९) संदल मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी माघ वद्य सप्तमीला मोठेबाबा यात्रोत्सव भरतो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती लावतात. मंगळवारी (दि. १) शोभेची दारु उडविण्यात येणार असून, त्यानंतर मनोरंजनाचा भिका-भीमा यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. बुधवारी कुस्त्यांची दंगल होणार असून, यासाठी नामवंत कुस्तीपटू दाखल होणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. रात्री हरिभाऊ बडे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. गुरुवारी सकाळी (दि. ३) हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी संदल मिरवणुकीत देवाची वस्त्रे व आयुधांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोठेबाबांच्या या वैशिष्यपूर्ण यात्रेस व सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या यात्रेसाठी नवसपूर्ती करुन पेढेवाटप करण्यात येतात. दापूर परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्याने यात्रोत्सवास दरवर्षी भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहत असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होते. यात्राकाळात नवसपूर्तीकरिता लोटांगण घालणे, गोडभात व शाकाहारी पदार्थांनी फकीर जेऊ घालणे, नारळ-पेढे वाटणे आदि प्रथा आहेत. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी कचूनाना आव्हाड, मोहन काकड, आर. बी. आव्हाड, सोमनाथ आव्हाड, प्रभाकर दराडे, बाळा वेताळे, वसंत आव्हाड, भास्कर आव्हाड, बी. डी. आव्हाड, अजीत सोमानी, भीमा आव्हाड, संदीप आव्हाड, विष्णू विंचुरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, यात्रा नियोजन समिती व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)
दापूर : सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा उत्सव
By admin | Published: February 29, 2016 10:33 PM