सिन्नर : तालुक्यातील दापूर गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर गेल्याने तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात पाहणी करून येत्या ११ जूनपर्यंत संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले. या कालावधीत गावाच्या सर्व सीमा सील करून कुणालाही गावात येण्यास किंवा गावाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.दि. ११ जूनपर्यंत गावातील सर्व प्रकारच्या सेवा बंद ठेवण्यात येणार असून, त्यात किराणा दुकाने, दूध संकलन केंद्र, बँकांचादेखील समावेश आहे. तहसीलदार कोताडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, महसूल व पोलीस विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत. मुंबईहून आलेल्या व्यक्तींचा अहवाल ३ दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील आठ जण व गावात खासगी प्रॅक्टिस करणाºया एका डॉक्टरला तपासणीसाठी नेण्यात आले होते. यापैकी एकाच कुटुंबातील सहा जणांचे अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर गावात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य यंत्रणेने सतर्कता दाखवत पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले आहे. यात संगमनेर तालुक्यातील एका डॉक्टरच्या कुटुंबीयांचादेखील समावेश आहे.आज गावातील पाच रुग्णांच्या कुटुंबातील सात जणांना तपासणीसाठी नेण्यात आले असून, आणखी एका खासगी डॉक्टरलाही तपासणीसाठी दाखल होण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. दापूर गावात १ मेनंतर जवळपास साडेसहाशे व्यक्ती मुंबई व बाहेरून आलेल्या आहेत. या सर्वांनी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी केलेल्या असल्या तरी सर्वेक्षणात त्यांच्यावरही देखरेख ठेवण्यात येणार आहे.या खेरीज गावात अजून दोनशे ते अडीचशे लोक बाहेरून आलेले असून त्यांनी गावात आगमनाची कोणतीही पूर्व सूचना शासकीय यंत्रणांना दिलेली नाही. त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर संचारबंदी भंगाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. दि.११ जून पर्यंत गावात संचारबंदी लागू राहणार असून आपत्कालीन परिस्थिती वगळता ग्रामस्थांनी घराबाहेर येण्याचे टाळावे असे आदेश देण्यात आले आहेत.गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. विनापरवानगी गावात आलेल्यांवर गुन्हे दाखल करून त्यांनादेखील शाळेतील सेंटरमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात यावे, असे डॉ. गायकवाड यांनी म्हटले आहे.
दापूर गाव ११ जूनपर्यंत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:49 PM
दापूर गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर गेल्याने तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात पाहणी करून येत्या ११ जूनपर्यंत संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले. या कालावधीत गावाच्या सर्व सीमा सील करून कुणालाही गावात येण्यास किंवा गावाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ठळक मुद्देखबरदारी : सहा रुग्ण आढळून आल्याने तहसीलदारांची कारवाई