नाशिक : दारणाकाठावर असलेल्या दोनवाडे ते बाभळेश्वरपर्यंतच्या गावांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार मागील दोन महिन्यांपासून सुरू असून यासोबतच वनविभागाकडून बिबटे जेरबंद करण्याची मोहीमदेखील युध्दपातळीवर सुरू आहे. बुधवारी (दि.२९) पहाटे देवळाली कॅम्प भागातील सैनिकी निवासस्थान भागात लावलेल्या पिंजऱ्यात प्रौढ नर बिबट्या जेरबंद झाला. दारणाकाठालगत या वीस दिवसांत पाचवा बिबट्या कैद करण्यास यश आले आहे.दारणानदीकाठाच्या दोनवाडे, भगूर, देवळाली कॅम्प, पळसे, शेवगेदारणा, बाभळेश्वर, चेहडी, चाडेगाव, सामनगाव, एकलहरे, मोहगाव, कोटमगाव या भागात बिबट्यांचा संचार सुरू असल्यामुळे नागरिकांत दहशत पसरली होती. या भागात सहा ते सात मानवी हल्ले झाले. या हल्ल्यांत चौघांचा बळी गेला तर चौघे लहान चिमुकले सुदैवाने बचावले. यानंतर या भागात नाशिक पश्चिम वनविभागाकडून या भागात बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली. ३८ ट्रॅप कॅमेरे, वीस पिंजरे लावण्यात आले. या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार आणि देवळाली कॅम्प भागात बुधवारी एक असे एकूण ५ बिबटे या महिनाभरात पिंज-यात जेरबंद करण्यास यश आले आहे. पहाटे येथील पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक विजय पाटील, अशोक खानझोडे यांनी वन्यप्राणी रेस्क्यू वाहनासह धाव घेत तत्काळ पिंजरा ताब्यात घेऊन सुरक्षितपणे हलविले.जाखोरीमध्ये जेरबंद करण्यात आलेला बिबट्या वगळता अन्य तीन्ही मादी बिबटे आहेत; मात्र देवळाली कॅम्पमध्ये जेरबंद क रण्यात आलेला बिबट्या हा नर असून अद्यापपर्यंत जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी सर्वात जास्त वयाचा आहे.