नाशिक : दारणाकाठावर असलेल्या दोनवाडे ते बाभळेश्वरपर्यंतच्या गावांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार मागील दोन महिन्यांपासून सुरू असून यासोबतच वनविभागाकडून बिबटे जेरबंद करण्याची मोहीमदेखील युध्दपातळीवर राबविली जात आहे. गुरूवारी (दि.३०) पहाटे चांदगिरी गावातील एका शेताजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. लागोपाठ दोन दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. हा बिबट्या अंदाजे दीड वर्षे वयाचा असल्याची माहिती सुत्रांनी दिली.दारणानदीकाठाच्या दोनवाडे, भगूर, देवळाली कॅम्प, पळसे, शेवगेदारणा, बाभळेश्वर, चेहडी, चांदगिरी, चाडेगाव, सामनगाव, एकलहरे, मोहगाव, कोटमगाव या भागात बिबट्यांचा संचार सुरू असल्यामुळे नागरिकांत दहशत पसरली होती. या भागात सहा ते सात मानवी हल्ले झाले. या हल्ल्यांत चौघांचा बळी गेला तर चौघे लहान चिमुकले सुदैवाने बचावले. यानंतर या भागात नाशिक पश्चिम वनविभागाकडून या भागात बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली. ३८ ट्रॅप कॅमेरे, वीस पिंजरे लावण्यात आले. या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सहा बिबटे या महिनाभरात पिंजऱ्यात जेरबंद झाले. यावरून दारणानदीकाठालगतच्या पुर्व भागातील गावांमध्ये बिबट्यांची संख्या सहज लक्षात येते. पहाटे येथील पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, रेस्क्यू वाहनचालक अशोक खानझोडे यांनी धाव घेत तत्काळ बिबट्या अडकलेला पिंजरा ताब्यात घेत वाहनातून सुरक्षितपणे हलविले.अवघ्या दीड वर्षाचा बछडाचांदगिरी शिवारात वनविभागाच्या पथकाने के.के फार्मजवळ बुधवारीच पिंजरा तैनात केला होता. या भागात बिबट्याने शेतकऱ्यांना दर्शन झाल्या होत्या. यामुळे येथे पिंजरा लावण्यात आला. या पिंजऱ्यात गुरूवारी पहाटे जेरबंद झालेला बिबट्या हा अंदाजे १ त दीड वर्षे वयाचा नर असल्याचे सुत्रांनी सांगितले.
दारणाकाठ : चांदगिरी शिवारात बिबट्याचा बछडा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:26 AM
या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सहा बिबटे या महिनाभरात पिंजऱ्यात जेरबंद झाले.
ठळक मुद्दे महिनाभरात अर्धा डझन बिबटे पिंजऱ्यात